तरीही ती घाबरली नाही ; नवव्या महिन्यात १२ वाड्यांमध्ये दिली आरोग्य सेवा

a 9 month pregnant women kalpna lendi provide a health service on duty in mandangad area ratnagiri
a 9 month pregnant women kalpna lendi provide a health service on duty in mandangad area ratnagiri

मंडणगड (रत्नागिरी) : तीन महिन्यांची गरोदर असताना म्हाप्रळ चेक पोस्टवर ड्यूटी करीत असताना आरोग्य सेविका कल्पना देवजी लेंडी चक्कर येऊन पडल्या. रक्तदाब कमी झाला, शारीरिक त्रास जाणवला. स्वतःच्या व पोटातील बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन प्रसंग जिवावर बेतला; मात्र पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर त्या पुन्हा सेवेत रुजू झाल्या. आता नवव्या महिन्यातही गावोगावी जात ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या कल्पना यांनी आरोग्य सेविका अभिधान सार्थ केले.

निवी ठाकूरवाडी, (रोहा) येथील कल्पना लेंडी २०१८ ला म्हाप्रळ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आल्या. दोन वर्षांपासून त्या म्हाप्रळ, इस्लामपूर, लोकरवण, अडखळवन, कुंभार्ली, पन्हळी, चिंचाळी या ७ गावांच्या १२ वाड्यांमध्ये आरोग्य सेवा देत आहेत. कोरोना काळात रुग्णसेवा देताना पती वसंत व साडेचार वर्षांचा मुलगा विघ्नेश आणि पोटातील बाळाची काळजी घ्यायची होती.

क्वारंटाईन कालावधीत बाहेरून गावात आलेल्या नागरिकांची नोंदणी, होम क्वारंटाईन संकल्पना, आरोग्यविषयी जनजागृती करताना घरोघरी जात होत्या. या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आल्याने पाच कंटेन्मेंट झोन लागू केले. यालाही धीरोदात्तपणे सामोरे जाताना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपर्कातील व्यक्तींचा डाटा तयार करणे, रुग्णांना मानसिक आधार देणे, वैद्यकीय सुविधा पुरविणे यात त्या अग्रेसर राहिल्या. वरिष्ठ तसेच आशा सेविका व सातही गावांतील ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळाल्याचे त्या म्हणाल्या. 

रजेऐवजी लोकसेवेला प्राधान्य

गरोदरपणाच्या सातव्या महिन्यापासून त्या रजा घेऊ शकत होत्या. मात्र, लोकसेवेला प्राधान्य देत ३० ऑक्‍टोबरपर्यंत त्या सेवा देणार आहेत. आरोग्य तपासणीला एका गावात विरोध झाला. तपासणी करून घ्यायला ग्रामस्थ तयार होईनात. वरिष्ठांच्या साह्याने समजूत काढत त्यांनी तपासणीला होकार मिळवला.

"रुग्णांना आरोग्यसेवा देताना मानसिक आधार, सकारात्मक विचारांनी संवाद करते. योग्य सेवा, माहिती मिळाल्याचे त्यांचे आभाराचे शब्द कामाला ऊर्जा देणारे ठरतात. या कामी सहकाऱ्यांची व वरिष्ठांची मदत महत्वपूर्ण आहे."

- कल्पना लेंडी, आरोग्य सेविका

संपादन - स्नेहल कदम 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com