हर्बल हनी हब उद्योगासाठी 90 टक्के अनुदान
चौकुळ परिसरात मधमाशांचे पालन हा समृद्धी आणणारा व्यवसाय ठरणार आहे. या परिसरातील मध हा हर्बल हनी असणार आहे. तयार करण्यात आलेला मध हा मध संचालनालय खरेदी करणार आहे. त्यामुळे त्याच्या विक्रीची चिंता उद्पादकांनी करु नये. आंबोली येथील मध केंद्राचे पुनरुजीवन करण्यात येणार आहे.
आंबोली - येथील परिसरातील मधाला महाराष्ट्रात सर्वत्र हर्बल हनी म्हणून ओळख आहे. ही ओळख वाढवून चौकुळ, गेळे व आंबोली हे हर्बल हनीचे हब तयार होईल. या उद्योगासाठी लागणारी यंत्र सामग्री 90 टक्के अनुदानावर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
चौकुळ येथे चांदा ते बांदा अंतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व मध संचालनालयाच्यावतीन आयोजित मधमाशी पालन विषयक एक दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, ""चौकुळ परिसरात मधमाशांचे पालन हा समृद्धी आणणारा व्यवसाय ठरणार आहे. या परिसरातील मध हा हर्बल हनी असणार आहे. तयार करण्यात आलेला मध हा मध संचालनालय खरेदी करणार आहे. त्यामुळे त्याच्या विक्रीची चिंता उद्पादकांनी करु नये. आंबोली येथील मध केंद्राचे पुनरुजीवन करण्यात येणार आहे. तसेच मध संकलनासाठी मधाच्या पेट्या या ग्रामस्थांच्या जमीनी सोबतच वन जमीन व जंगलांमध्येही लावता येणार आहेत. या क्षेत्रात मधाचे चांगले उत्पादन मिळू शकणार आहे. या योजनेचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.''
ते पुढे म्हणाले, ""येत्या 15 दिवसात चांदा ते बांदा अतंर्गत सर्व योजना या गावांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी लाभार्थी निवड लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकारी वर्गाला दिल्या. गाई पालन, शेळी - मेंढी पालन, कुक्कुट पालन यासाठी इच्छुक लाभार्थ्यांची यादी ताबडतोब तयार करावी. त्यांचे प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावावेत.''
मधमाशा पालनासाठीचे लाभार्थी निवडून त्यांचे प्रशिक्षण याच आठवड्यात सरू करण्यात येणार आहे. आंबोली क्लस्टरमध्ये मधाचा व्यवसाय लवकरच सुरू व्हावा, अशा सूचना करुन या व्यवसायासाठी लागणारी सामग्री 90 टक्के अनुदानावर ग्रामस्थांना पुरवण्यात येणार आहे. रेशीम केंद्राचेही पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. चौकुळ येथे सुसज्ज असे माजी सैनिक भवन बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चौकुळमध्ये गुऱ्हाळ देण्यात येणार आहे, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले.
प्रस्ताविक खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी केले. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जी.जी. मोहित यांनी स्वागत केले. श्री. जगताप व श्री. पाटील यांनी मधमाशा पालनासंबंधी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर मध महासंचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील, महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, चौकुळच्या सरपंच रिता नाईक, पारपोलीच्या सरपंच रेश्मा गावकर, पंचायत समिती सदस्य मोहन चव्हाण, बुलतेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश सावंत, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अरुष गावडे, संचालिका मंजुषा गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमा गावडे, राजन पोकळे, अशोक दळवी, चांदा ते बांदा समन्वयक गजानन धनवडे, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी गुरुनाथ मोहित, कृषी अधिकारी अनिल अडसूळ, सहाय्यक गट विकास अधिकारी वासूदेव नाईक, वनाधिकारी श्री. धुरी, सावंतवाडीचे नायब तहसिलदार केरकर, माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.