
ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील आरोग्य वर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय या सर्व संस्थांमध्ये एकूण 94 फिवर क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत. काल (ता. 9) पाठविलेल्या चार नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले नसून आज नव्याने 9 नमुने पाठविले आहेत. त्यामुळे 13 नमुने अहवालाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. दिवसभरात आयसोलेशनच्या रुग्णांची संख्या आठने वाढली असून 26 रुग्ण या कक्षात उपचार घेत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षामध्ये गुरुवारी 18 रुग्ण उपचार घेत होते. त्यात आज 8 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे सध्या या कक्षात 26 रुग्ण एकूण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 81 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 68 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 13 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण 1355 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यात कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत.
जिल्ह्यात मजूर, बेघर व परराज्यातील कामगार यांच्यासाठी कॅम्प उभारण्यात आले असून त्यांच्या जेवनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी निवासी कॅम्पना स्वतः भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
क्वारंटाइन पूर्ण करणाऱ्यांची सेंचुरी
जिल्ह्यात 374 व्यक्तींना घरीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. 68 व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आतापर्यंत 100 व्यक्तींचे 28 दिवसांचे क्वारंटाइन पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. संचारबंदी असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याविरोधाक पोलिसांनी आज 10 गुन्हे दाखल केले आहेत. तर 32 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
लक्षणानुसार उपचारासाठी हॉस्पिटलची निर्मिती
तापाच्या आजाराच्या लक्षणांनुसार प्रशासनाने जिल्ह्यात उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सौम्य प्रकारच्या रुग्णांना उपचारासाठी 17 संस्थांमध्ये सीसीसी अर्थात कोवीड केअर सेंटर, मध्यम प्रकारच्या रुग्णांसाठी 4 डीसीएचसी अर्थात डेसिगनेटेड कोवीड हेल्थ सेंटर व तीव्र प्रकारच्या रुग्णांच्या उपचारासाठी 1 डीसीएच म्हणजेच डेसिगनेटेड कोव्हीड हॉस्पिटल अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.