esakal | तीनशे वर्षांच्या गौराया झाल्या प्रसन्नवदना
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun

तीनशे वर्षांच्या गौराया झाल्या प्रसन्नवदना

sakal_logo
By
शिरीष दामले : सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: तीनशे वर्षे जुन्या पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या गौरीचे लाकडी मुखवटे पुन्हा वापरता येतील वा नाही, अशा चिंतेत असलेल्या चिपळूण येथील सुर्वे कुटुंबीयांना सागर मोहिते यांनी सुखद धक्का दिला. अत्यंत सुबक, कोरीव काम केलेल्या लाकडी मुखवट्यांना त्यांनी नवा साज दिला. त्यामुळे सुर्वे कुटुंबीयच नव्हे, तर स्वतः सागरही हरकून गेले असूनत आपल्या हातून हे काम अज्ञात शक्तीनेच करवून घेतले, अशी अगदी नम्र भावना त्यांनी व्यक्त केली.

सागर मोहिते हे चिपळुणातील तरुण वास्तुविशारद. थिसीसच्या कामासाठी ऑस्ट्रेलियात गेलेले. सध्या लॉकडाउनमुळे चिपळूणमध्ये आहेत. त्यांना चित्रकलेची, शिल्पकलेचीही आवड व त्यात गती आहे. मित्र मयूर सुर्वे यांच्या घरातील गौरींच्या मुखवट्यांचे सागर यांनी जणू पुनरुज्जीवनच केले.

याबाबत सागर म्हणाले, की मला जुन्या वस्तू, वास्तू आणि यामुळे जपला जाणारा सांस्कृतिक वारसा यांची आवड आहे. घरांचे आराखडे बनवितानाही त्यात परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपता येईल, असा प्रयत्न मी करतो.लाकडांच्या मुखवट्यांची रया दीर्घकाळामुळे गेली होती. त्या बदलण्याऐवजी त्यांना नवा साज देण्याचे आव्हान मी स्वीकारले.

३०० वर्षांच्या गौरींच्या मुखवट्याचे रिस्टोरेशन केले आहे. त्यावर याआधीही काही कलाकारांनी त्यांच्या कलेनुसार काम केले होते. मात्र, यावर्षी पूजेत नव्या गौरी घेण्याऐवजी याच अधिक चांगल्या करून पाहूया, असे म्हणत मयूर सुर्वे यांनी गौरीचे मुखवटे माझ्याकडे आणून दिले. त्यामुळे ते काम मी अत्यंत मन लावून केले. त्यात एम सील वापरले. त्यात काम करणे सोपे नाही. कारण ते मऊ असते आणि लगेच सुकते, असे सागर म्हणाले.

हेही वाचा: गणेश मूर्ती विक्रेत्यांना आर्थिक फटका; पाहा व्हिडिओ

या गौरी महाराष्ट्रीय सांस्कृतिक परंपरा आणि त्यातही कोकणी परंपरा यांच्याशी साधर्म्य सांगतील, अशा मला करायच्या होत्या. त्याचबरोबर कोणाचीच नक्कल न करता त्यात माझी काहीतरी कला करायची होती. त्यादृष्टीने गौरीचे दागिने, वेशभूषा यावर काम केले. देवीचे भाव हे सर्वांत महत्त्वाचे होते. कोणत्याही व्यक्तीचे भाव त्याच्या डोळ्यांतून व्यक्त होतात. त्यामुळे गौरींचे डोळे रंगविले. नैसर्गिक चेहरा वाचण्यासाठी लिपस्टिकचा वापर मी टाळला.

सहजसुंदर महाराष्ट्रीय नैसर्गिक मुद्रा वाटेल, असे गौरींचे दोन्ही मुखवटे तयार झाल्याने मला मनस्वी आनंद झाला. हे काम करण्याचा मी भरपूर आनंद घेतला. मुखवट्यांचे नाक नीट करताना आणि रंग काढताना मला आत्यंतिक काळजी घ्यायला लागली, असेही सागर म्हणाले.

चैत्रगौरही बसवली होती

आणखी एका मित्राने पितळीचे मुखवटे मला बनवण्यासाठी आणून दिले. ते कामही मी अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करून दिले. पितळेच्या मुखवट्यांवर काम करतानाही कामाची भरपूर मजा मिळाली. याआधी चैत्र महिन्यात झोपाळ्यावर बसलेली चैत्रगौरही मी बनवून दिली होती. आता तर माझ्या एका मित्राला त्याच्याकडे असलेल्या खड्याची गौरही सुपाऱ्यांवर करून पाहिजे आहे. तोही प्रयत्न मी आनंदाने करणार.

हेही वाचा: पुणे महापालिकेचा 'हा' अट्टाहास गणेश मूर्ती विक्रेत्यांना देशोधडीला लावणारा

प्रतिक्रियेतून कामाची पोच

गौरी माहेरवाशीण मानली जाते. सासरच्या रामरगाड्यात कामाच्या भाराखाली पिचलेली स्त्री दोन दिवस माहेरी जाऊन आली की प्रसन्न टवटवीत दिसू लागते. या गौरायांच्या चेहऱ्यावरील शिणवटा जाऊन पुन्हा त्या प्रसन्नवदना झाल्या आहेत. पुढची तीनशे वर्षे या आदिमाया हसतमुखाने जगातील दुःखं, संकटं निवारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, ही संध्या साठे-जोशी यांची प्रतिक्रिया म्हणजे माझ्या कामाची मिळालेली पावतीच आहे.

loading image
go to top