esakal | बाग सफाईवेळी तरुणाचा होरपळून अंत; बामणोलीतील घटना

बोलून बातमी शोधा

Crime

संजयचे शवविच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. त्यांच्या अशा निधनामुळे लोकम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बाग सफाईवेळी तरुणाचा होरपळून अंत; बामणोलीतील घटना
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

देवरूख (रत्‍नागिरी) : संगमेश्‍वर तालुक्‍यातील बामणोली येथे काजूच्या बागेची साफसफाई करताना लावलेल्या आगीत होरपळून तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. संजय विठ्ठल लोकम (वय 49, रा. करंडेवाडी- बामणोली, संगमेश्‍वर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याची खबर संजयचा भाऊ विजय लोकम यांनी दिली.

संजय हे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास काजूची बाग साफ करण्यासाठी गेले होते; मात्र ते सायंकाळी चार वाजेपर्यंत घरी आलेच नाहीत, म्हणून संजय यांचा भाऊ विजय हे त्यांना बघायला गेले. काजूच्या बागेच्या दिशेने जात असतानाच संजय हे आगीत होरपळलेल्या स्थितीत दिसून आले. या वेळी संजय यांना हाक मारून त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने विजय यांनी वाडीतील ग्रामस्थांच्या साहाय्याने त्यांना देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी संजयला मृत घोषित केले.

संजयचे शवविच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. त्यांच्या अशा निधनामुळे लोकम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. संजयवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विद्या पाटील करीत आहेत.

काही महिन्यांपूर्वी आले होते गावी...

काजूची बाग साफ करताना त्यांनी आजूबाजूच्या गवताला आग लावली असावी आणि या आगीने रौद्र रूप धारण केले असावे आणि ही आग विझविण्यासाठी संजयने प्रयत्न केले असताना ते आगीत अडकून त्यातच होरपळले असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिस व्यक्त करीत आहेत. संजय हे मुंबईत छायाचित्रणाचा व्यवसाय करीत होते. काही महिन्यांपूर्वी ते गावी आले होते.