कोकणी शेतकरी आदित्यनां म्हणाला, आत्महत्येशिवाय पर्याय नायं

रविंद्र साळवी
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

आदित्य यांनी त्या शेतकऱ्याला धीर देत घाबरू नका, आता सरकारच तुमच्याकडे येऊन नुकसान भरपाई देईल असा विश्वास दिला.

लांजा (रत्नागिरी) - काय शिल्लक राहील नाही. पावसाने सगळे गेलेय. आहे ते किडलयं..त्यामुळे आम्हाला सरसकट नुकसान भरपाई द्या, कोकणात ओला दुष्काळही जाहीर करा द्यायचं तर भरघोस द्या..नाहीतरं आता आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही, अशी व्यथा कोकणातील शेतकऱ्यांनी युवासेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या समोर मांडली. 

यावर आदित्य यांनी त्या शेतकऱ्याला धीर देत घाबरू नका, आता सरकारच तुमच्याकडे येऊन नुकसान भरपाई देईल असा विश्वास दिला.  

श्री. ठाकरे यांनी आज कोकणातील भात शेतीच्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी दाैरा केला. यामध्ये लांजा तालुक्यातील कुवे येथे त्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. श्री. ठाकरे यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासनही दिले. 

कुवे येथे आल्यानंतर शेतात काम करत असलेले विनायक तुकाराम नेमणे यांची शेतात जाऊन आमदार ठाकरेंनी पाहणी केली. झोडलेले भात एका टोपलीत घेऊन नेमणे यांनी पावसाचा कसा परिणाम झालायं याची माहिती आदित्य यांना दिली. या शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेत, मी कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍यांना मदत देणार असल्याचेही श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, शिवसेना युवाप्रमुख शेतकर्‍यांच्या भेटीसाठी येणार म्हटल्यावर लांजा तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली. त्यामध्ये युवकांचा सर्वाधिक समावेश होता.

भातशेती संदर्भातील जिल्ह्याची परिस्थिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आमदार ठाकरे यांना दिली. यावेळी स्थानिक पदाधिकारी युवासेना कार्यकारणी सदस्य पवन जाधव, लांजा तहसीलदार वनिता पाटील, लोकसभा सह संपर्कप्रमुख शरद जाधव, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, तालुका युवाधिकारी धनंजय गांधी, राजापूर सभापती अभिजित तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उप विभागप्रमुख व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aaditya Thackeray Visits Konkan Nonseasonal Rains Affected Farmers