कृषी योजनांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार - अभिजित तेली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

राजापूर - कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत की कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी, असा सवाल करीत कृषी विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या विविध योजनांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या साऱ्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सभापती अभिजित तेली यांनी पंचायत समितीच्या बैठकीमध्ये दिले. 

राजापूर - कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत की कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी, असा सवाल करीत कृषी विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या विविध योजनांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या साऱ्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सभापती अभिजित तेली यांनी पंचायत समितीच्या बैठकीमध्ये दिले. 

घरभाड्यासह विविध प्रकारचे भत्ते घेणारे कृषी मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक त्या-त्या ठिकाणी राहतात काय,असा सवाल करीत या सभेमध्ये कृषी विभागाच्या कारभाराचा पंचनामा केला. पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी आणि कृषी विभाग यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता विकोपाला गेला आहे. त्याचे पडसाद आज झालेल्या पंचायत समितीच्या सभेमध्ये पुन्हा एकदा उमटले. कृषी विभागाच्या आढाव्यावेळी सभापती तेली यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचल्या नसून कोणालाही विश्‍वासात न घेतला अनेक योजना कृषी विभाग राबवत आहे. त्यांच्या या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शेतकरी हिताच्या योजना केवळ कागदोपत्री राबवून निधी लाटण्याचे काम अधिकारी आणि कर्मचारी करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कृषी विषयक योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत नसेल तर, कृषी विभाग कशासाठी असा सवालही त्यांनी केला.दरम्यान, कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. 

उपसभापती प्रशांत गावकर, प्रभारी गटविकास अधिकारी वाय.एस. भांड, प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी सुशांत एकल यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

शासनाची फसवणूक करतात 
नियुक्तीच्या ठिकाणी न राहणारे कृषी मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक घरभाड्याची रक्कम घेऊन शासनाची फसवणूक करीत असल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केला. कृषी विभागाच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची सूचना त्यानी प्रशासनाला केली. तसा ठरावही सर्वानुमते यावेळी पारीत करण्यात आला. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhijeet Teli comment