esakal | आत्मनिर्भर पॅकेजचा लाभ घ्या ः तावडे
sakal

बोलून बातमी शोधा

About the self-contained package Tawde's appeal

भाजपतर्फे 24 एप्रिलपासून आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला सुरुवात झाली होती. याचा समारोप आज येथील महालक्ष्मी सभागृहात श्री. तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

आत्मनिर्भर पॅकेजचा लाभ घ्या ः तावडे

sakal_logo
By
अजय सावंत

कुडाळ (सिंधुदुर्ग) - आत्मनिर्भर भारत अभियानाच्या योजना प्रत्येक तालुक्‍यात पोचण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ लाखांपैकी किमान लाखभर लोकांनी आत्मनिर्भरता पॅकेजचा फायदा घेतल्यास जिल्हा आत्मनिर्भरतेवर उभा राहण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री विनोद तावडे यांनी केले. आत्मनिर्भर भारत संवाद अभियानच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. 

भाजपतर्फे 24 एप्रिलपासून आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला सुरुवात झाली होती. याचा समारोप आज येथील महालक्ष्मी सभागृहात श्री. तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, आत्मनिर्भर अभियान जिल्हा संयोजक अतुल काळसेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, राजू राऊळ, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, चारुदत्त देसाई, दादा साईल, नगराध्यक्ष ओंकार तेली, प्रणाली राणे, संजू परब, राजन गिरप, विनायक राणे, बंड्या सावंत, सावी लोके, बाळू देसाई, विजय केनवडेकर, श्‍वेता कोरगावकर, भाई सावंत, प्रमोद रावराणे, राकेश कांदे, विजय कांबळी आदी उपस्थित होते. 

तावडे म्हणाले, ""देश कोरोना संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्वांना आत्मनिर्भर करण्याचे काम केले आहे. महिला बचतगट, युवावर्ग उद्योगांना दिलासा देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले. लोकल फॉर ग्लोबलच्या माध्यमातून जगापर्यंत विविध उत्पादनांच्या माध्यमातून आपण पुढे गेले पाहिजे. केंद्राच्यावतीने मोदी यांनी विविध योजनांसाठी प्रत्येकाचा सर्वांगीण विकास व उन्नती साधण्यासाठी कोट्यवधीचा निधी स्वतंत्र ठेवला आहे. कोरोना संकटात गेले सात महिने प्रत्येकजण अनेक संकटांशी सामना करत असताना त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचे काम केंद्राच्या माध्यमातून होत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाख आहे. पैकी एक लाख लोकांनी आत्मनिर्भरतेचा फायदा घेण्यासाठी भाजप कार्यकर्ता म्हणून काम केले पाहिजे.'' 

ते पुढे म्हणाले, ""शेतकऱ्यांना उद्योजक करण्याचे काम मोदी सरकार करत असताना त्यांना थांबवण्याचे काम कोणी करू नये. येत्या 2022 पर्यंत येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे.'' खासदार नारायण राणे कोरोनावर लवकरच मात करून बरे होतील असेही ते म्हणाले. 

जिल्हाध्यक्ष तेली यांनी राज्यातील सत्ताधारी शिवसेना कोरोना संकटात निष्क्रिय ठरल्याचे सांगितले. अतुल काळसेकर यांनी आत्मनिर्भरसाठी जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमाचा धावता आढावा घेतला. जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी सूत्रसंचालन केले. सुरूवातीला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. 

तावडे यांचा भव्य सत्कार 
कोकणच्या सुपुत्राला भाजपाचे राष्ट्रीय सचिव पद मिळाले, हे जिल्हावासियांसाठी निश्‍चितच भूषणावह आहे. म्हणूनच श्री. तावडे यांचा आज भव्य नागरी सत्कार पार पडला. यावेळी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top