चालत्या रोरो वरून ट्रक कोसळला अन्...

राजेश कळंबटे
Wednesday, 18 November 2020

हा प्रकार झाल्यानंतर गाड्या त्या त्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

रत्नागिरी : कोकण रेल मार्गांवर खेड ते करंजाडीच्या दरम्यान चालत्या रोरो गाडीवरील ट्रक खाली पडल्याने विचित्र अपघात घडला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामुळे दोन रेल्वे गाड्या उशिराने धावत होत्या. सुदैवाने ट्रकमधील चालकाने प्रसंगावधान राखत  वेळीच खाली उडी मारल्यामुळे जीव वाचला. 

हा प्रकार घडल्यानंतर कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांच्यासह सर अधिकारी घटना स्थळी दाखल झाले होते. अपघात रिलिप व्हॅन ही तात्काळ तिथे पोचली. 
मुंबईहुन गोव्याकडे जाणारी रो रो रात्री एक वाजण्याच्या दरम्यान दिवाणखवटी पासून एक किलोमीटर अंतरावर आली असता रोरो वरील एक ट्रक अचानक खाली पडला. काही अंतरावर ट्रकला हादरे बसत होते. त्यामुळे ट्रक मधील चालकाने खाली उडी मारली. वेगाने जाणाऱ्या गाडीवरून कोसळलेल्या ट्रकचा चुराडा झाला. यामध्ये ट्रेनचा मधला भाग रुळावरून खाली उतरला.

हेही वाचा - चिपळूण : प्रशासनाच्या कारवाईची चुकीची वेळ ; नगराध्यक्षा

सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. खाली पडलेल्या ट्रकमध्ये लोखंडी प्लेट होत्या. हा प्रकार झाल्यानंतर गाड्या त्या त्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. कोकण कन्या आणि तुतारी या दोन गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या. हा प्रकार घडल्यानंतर अपघात रिलिप व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. रुळावरून खाली आलेल्या रोरो चा भाग वर आणला गेला. यासाठी सुमारे दोन तासाचा कालावधी लागला. पहाटेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हा प्रकार कसा घडला याची चौकशी सुरु झाली असून कोकण रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करत आहेत. खाली पडलेला ट्रक योग्य पद्धतीने बांधला नसावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हादरे बसून तो खाली पडला असावा. अन्यथा वेल्ड फेल्युअर मुळे रोरो चा भाग खाली उतरल्याने हा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबत चौकशी सुरु झाली आहे.

हेही वाचा -  माजी नगरसेवकाचा खोक्यावर चढून आत्महत्येचा इशारा

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the accident of ro ro train truck was colapas from run train in ratnagiri yesterday but no any mortality