मध्यरात्रीच रचला सापळा आणि टाकली धाड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

होडीतून दारू नदीकिनारी आणून मोटारीत दारूचे खोके भरण्यात येत असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली होती.

बांदा (सिंधुदुर्ग) - सातोसे-दत्तवाडी येथे तेरेखोल नदीकिनारी होडीतून केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात येथील पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजता कारवाई केली. 1 लाख 88 हजार 160 रुपयांच्या दारूसह 3 लाख 50 हजारांची मोटार (एमएच 07 क्‍यू 4959), असा एकूण 5 लाख 38 हजार 160 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी स्वप्नील शशिकांत राऊळ (रा. सातार्डा, ता. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. तर गौरेश वेंगुर्लेकर व सचिन गोवेकर हे दोघे संशयित अंधाराचा फायदा घेत जंगलात पळून गेले. 
ही कारवाई येथील पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रमोद मोरजकर, महेश भोई, मनीष शिंदे, बाळकृष्ण गवस, राजेंद्र शेळके व होमगार्ड जयेश गावडे यांच्या पथकाने केली. 

सापळा रचून कारवाई 
तेरेखोल नदीत होडीतून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारूची वाहतूक होत असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. या कारवाईमुळे नदीतून दारू वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. होडीतून दारू नदीकिनारी आणून मोटारीत दारूचे खोके भरण्यात येत असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नदीकिनारी माड बागायतीत सापळा रचण्यात आला होता. मोटारीत खोके भरतानाच पथकाने धाड टाकून मुद्देमाल जप्त केला. गोवा बनावटीच्या विविध ब्रॅंडचे एकूण 48 खोके जप्त करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on alcohol satose konkan sindhudurg