
मास्क न वापरणाऱ्यांवर येत्या दोन दिवसात कडक कारवाई सुरू करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या व्यापाऱ्यांची व नागरिकांची मागणी लक्षात घेता सरसकट लॉकडाऊन करणार नाही; परंतु मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे दिला.
श्री. सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "जिल्ह्याला ऑक्सिजन प्लांटसाठी 72 लाखाचा निधी मिळाला आहे. ते काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. आठवड्याभरात प्लांट सुरू होणार आहे. मोठ्या 58 बाटली भरण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात भविष्यात जिल्ह्याला ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही.''
ते म्हणाले, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेचा दुसरा टप्पा आता लवकरच सुरू होणार असून या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक घरातील सर्व व्यक्तींना प्रत्येकी दोन मास्क, सॅनिटायझर आणि हॅन्ड वॉशचे वाटप केले जाणार आहे. जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही, तोपर्यंत आपल्याजवळ हाच एक उपाय आहे .त्यामुळे यापुढे आता प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक असणार असून मास्क न वापरणाऱ्यांवर येत्या दोन दिवसात कडक कारवाई सुरू करण्याचे आदेश मी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.''
ते म्हणाले, "गेल्या चार-पाच महिन्यात व्यापाऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान लक्षात घेता जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला नाही; मात्र व्यापाऱ्यांची आणि जनतेची संमती असेल तरच ते शक्य आहे. कारण यासंदर्भात कोणताही निर्णय घेणे प्रशासनाच्या हातात राहिलेले नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी लॉकडाऊनची गरज आहे, त्या ठिकाणच्या व्यापारी व जनतेने त्यासंदर्भातील निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी.''
जागेचा प्रश्न सुटल्यानंतर...
सावंतवाडीत होणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भात श्री. सामंत म्हणाले, ""हॉस्पिटल नियोजित जागेतच होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जागेचा प्रश्न सुटल्यानंतर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी येत्या काही दिवसात आपण जिल्ह्यात येऊन या विषयावर चर्चा करणार आहे.''
टीका करण्यापेक्षा कामाचं बघा!
दरम्यान आपला भांग बदलला, अशी टीका करणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी नेहमी टीका करण्यापेक्षा आमच्यासोबत येऊन कोरोनाच्या विरोधात काम करावे, त्यांना माझी काळजी आहे, हे ऐकून बरे वाटले; मात्र त्यांच्या प्रत्येक टीकेला मला उत्तर द्यावेसे वाटत नाही, असे सांगून त्यांनी बोलणे टाळले.
संपादन : विजय वेदपाठक