राणे कार्यकर्त्यांनी लोकसभेला एकाच वेळी खरेदी केल्या 13 गाड्या ; कर्जफेड न केल्याने गाड्या होणार जप्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

बोलेरो गाड्यांचे खरेदीदार आणि जामीनदार यांना जिल्हा बॅंकेने जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

कणकवली (सिंधुदुर्ग) : २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंच्या कार्यकर्त्यांनी एकाच वेळी १३ मोटारी खरेदी केल्या होत्या. त्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड अद्याप झालेली नाही. त्यामुळे विरोधक तथा वाहनांचे खरेदीदार आणि जामीनदार जप्तीच्या कचाट्यात सापडले असल्याचा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला.

बोलेरो गाड्यांचे खरेदीदार आणि जामीनदार यांना जिल्हा बॅंकेने जप्तीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटिसांमुळे चिडलेले विरोधकांचे कार्यकर्ते आता जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर टीका करत आहेत; मात्र कितीही टीका झाली तरी शिवसेना सावंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचेही नाईक म्हणाले. 

हेही वाचा - रात्री चमकणाऱ्या लाटांचं सत्य काय, गुलाबी थंडीत रत्नागिरीतील आरे वारे समुद्रकिनारा का होतो निळाशार? -

विजयभवनमध्ये नाईक बोलत होते. ते म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकाच वेळी १३ बोलेरो गाड्यांची खरेदी झाल्याने निवडणूक आयोगाने या गाड्या जप्त करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या. या गाड्‌यांसाठी जिल्हा बॅंकेकडून कर्ज उचल झाली असून विरोधकांचे कार्यकर्ते हेच या गाड्यांचे खरेदीदार आणि जामीनदार आहेत. गेल्या सहा वर्षात बोलेरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणाची परतफेड झालेली नाही. 

या कर्जप्रकरणी जप्तीच्या नोटिसा गेल्याने संबंधित कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.’’ दरम्यान जिल्हा बॅंकेवर आरोप करणाऱ्या भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेत यावे. तेथील संपूर्ण पारदर्शक कारभार सतीश सावंत हे निश्‍चितपणे त्यांना दाखवतील. जिल्हा बॅंकेची संपूर्ण पाहणी झाल्यानंतरच चव्हाण यांनी बॅंकेबाबत आपले मत मांडावे असेही नाईक म्हणाले.

हेही वाचा - नारायण राणे मुख्यमंत्री व्हावेत असे त्यांच्या मुलाला वाटत नाही

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the activist of rane bank send a notice for loan not paid for election car in sindhudurg