आता फक्त आस प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची!

मकरंद पटवर्धन
Monday, 3 August 2020

‘रामलल्ला हम आयेंगे मंदिर वही बनाएंगे’, ‘अयोध्या तो बस झांकी है, काशी- मथुरा बाकी है’..

रत्नागिरी : शरयू तीरावरून मूठभर माती आणा, उद्या रामलल्लाचे मंदिर उभारायचे आहे. ‘रामलल्ला हम आयेंगे मंदिर वही बनाएंगे’, ‘अयोध्या तो बस झांकी है, काशी- मथुरा बाकी है’, अशी घोषणाबाजी आणि नेत्यांची भाषणे ऐकून आमचे रक्त सळसळले. ६ डिसेंबर १९९२ ला तब्बल १५ लाखांचा विराट जनसमुदाय आला होता. बाबरी मशिदीच्या घुमटावर कारसेवक चढले आणि दुपारपर्यंत मशीद पडली. त्या मूळ जागेवर प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहणार. तेव्हाची कारसेवा आणि मंदिर निर्माण पाहता येत आहे. आता आस लागली आहे, रामलल्लाच्या दर्शनाची... कारसेवक ॲड. रत्नाकर रामकृष्ण हेगिष्टे सांगत होते.

हेही वाचा - पोस्टामुळे रक्षाबंधनाचे नाते कोरोनातही होतेय अधिक घट्ट..

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. हेगिष्टे यांनी ‘सकाळ’शी बोलताना आठवणी जागवल्या. ते म्हणाले, ‘‘घरून फक्त मोजके कपडे शबनममध्ये घेऊन गाडीतून मित्रांसोबत ठाण्यात पोहोचलो. स्टेशनवरील बाहेरचे काही खाऊ नका, त्यातून विषबाधा होईल, अशी सूचना होती. प्रत्येक स्टेशनवर कारसेवक गाडीत येत होते. अयोध्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेख नियोजन व शिस्त पाहायला मिळाली. मुख्य भूमिका बजरंग दलाची व अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी होत्या. मोठा तंबू होता. कायदा मोडायचा नाही, फक्त शरयूची माती आणून खड्डा भरण्याच्या सूचना मिळाल्या. दुपारनंतर भाषणांचा नूर पालटला. ‘तुमच्या मनात आहे, तेच होणार. तुम्ही छाती काढून गावाला जाल,’ असे नेते सांगत होते, असे ॲड. हेगिष्टे म्हणाले.’’ 

हेही वाचा - `या` किल्ल्याची तटबंदी ढासळतेय, लक्ष देण्याची शिवप्रेमींची मागणी...

६ डिसेंबरला सकाळी पाच-सहा किलोमीटरपर्यंत रांग पोहोचली. मारुतीच्या वेशात गदा घेऊन एक कारसेवक आला. त्याने गदेचे आवरण काढले, आत लोखंडी घण होता. प्रशिक्षित कारसेवक घुमटावर चढले. मशिदीच्या चावीचा दगड काढला आणि पहिला घुमट ११ च्या दरम्यान पडला. मधला मोठा घुमट पडायला दोन-तीन तास लागले. नंतर सर्व कारसेवक आनंदाने उड्या मारायला लागले. दुसऱ्या दिवशी पत्र्याच्या शेडखाली रामलल्लाची मूर्ती पाहिली आणि धन्य झालो, असे ॲड. हेगिष्टे 
यांनी सांगितले.

ती गर्दी दर्शनासाठीही होईल..
त्या वेळी अयोध्येत हिंदू, मुस्लिम दुकानदार होते. त्यांनी चहा-कॉफीसह हॉटेलमध्ये कमी पैशांत जेवणखाण दिले. काही कमी पडू दिले नाही. ती ऐतिहासिक गर्दी आताही दर्शनासाठी जमेल, असे हेगिष्टे यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ad hegishte comments ram temple