
सुखद धक्का! अखेर 20 वर्षांनी झाली मायलेकरांची भेट
मालवण : विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या एका आईची स्थानिकांसह, संस्थांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर वीस वर्षांनी पुत्रांची भेट झाली. (mother and her son) विमनस्क अवस्थेत फिरणारी अनेक माणसे आपण रोज बघतो. आपल्यापैकी अनेकजण त्यांना खायलाही देतात; परंतु ती कुठली आहे? आपल्याकडे कशी आली? हा विचार आपण करतो का? अशीच एक मनोरुग्ण मध्यमवयीन स्त्री २००५ पासून तालुक्यातील चौके गावात (chauke villege) फिरत होती. सुरवातीला तिला काहीच कळत नव्हते. कालांतराने तिला बऱ्याच अंशी कळू लागले.
सहा महिन्यांपूर्वी चौके गावच्या रहिवासी आणि पंचायत समिती सदस्या मनीषा वराडकर यांनी त्या महिलेबाबत डॉ. शरदचंद्र काळसेकर यांच्याशी चर्चा केली. संबंधित महिलेने सांगितलेला पत्ता व फोटो काढून डॉ. काळसेकर यांनी राज्यस्तरावरच्या डॉक्टरांच्या ग्रुपवर ही माहिती टाकली. ही पोस्ट व्हायरल झाली. त्या महिलेच्या गावावरून डॉ. काळसेकर यांना फोन आले. यात त्या महिलेचे नाव द्वारकबाई देवराम डोळे (रा. चिंचोली (बावणे) ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) असल्याची माहिती मिळाली. दुसऱ्याच दिवशी द्वारकाबाई डोळे यांचे कृष्णा व शिवशंकर हे दोन्ही मुलगे मुंबईहून चौके येथे आले; परंतु आईच मुलांना नीटशी ओळखत नसल्याने मालवण पोलिसांत हे प्रकरण पोचले. त्याचवेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर यांनी योग्यवेळी मदत केल्याने हा प्रश्न सुटला आणि तिचा घरी जाण्याचा मार्ग २० वर्षानंतर मोकळा झाला.
एका अनोळखी मनोरुग्ण महिलेला तिच्या मुलांकडे पाठविण्यासाठी पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य मनीषा वराडकर, डॉ. शरदचंद्र काळसेकर, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा सचिव किशोर नाचनोलकर, चिंचोली-बुलढाणा सरपंच भगवान पालवे, सोपान घुगे, पत्रकार संतोष गावडे, बेळणे चेक पोस्टचे पोलिस कर्मचारी श्री. सावंत, सकिना भाभी यांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच त्या आईची वीस वर्षांनी आपल्या मुलांशी भेट झाली.