तब्बल 24 वर्षांनी दिली दहावीची परीक्षा

विनोद दळवी 
Thursday, 30 July 2020

1996 मध्ये दहावी नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देता आली नाही; मात्र त्यांना दहावी उत्तीर्ण होण्याची प्रबळ इच्छा होती. भाई कदम यांनी वयाच्या 42 व्या वर्षी तब्बल 24 वर्षांनी दहावीची परीक्षा दिली.

ओरोस (सिंधुदुर्ग) - माणुस आयुष्यभर विद्यार्थी असतो. माणसाचे शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. शिक्षणासाठी वय पाहिले जात नसते. शिकण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची असते. हेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागात परिचर म्हणून कार्यरत असलेल्या सत्यवान रामचंद्र ऊर्फ भाई कदम यांनी 42व्या वर्षी इयत्ता 10 वीची रिपीटर परीक्षा देऊन त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सिद्ध केले आहे. 

जिल्हा परिषद आरोग्य विभागात भाई कदम हे कंत्राटी परिचर म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत गरीब परिस्थिती असणारे भाई कदम यांना 1996 मध्ये दहावी नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देता आली नाही; मात्र त्यांना दहावी उत्तीर्ण होण्याची प्रबळ इच्छा होती. भाई कदम यांनी वयाच्या 42 व्या वर्षी तब्बल 24 वर्षांनी दहावीची परीक्षा दिली.

कदम यांचे 1996 मध्ये दहावीमध्ये मराठी, इंग्रजी, गणित आणि समाजशास्त्र हे चार विषय राहिले होते. त्यांनी यंदाच्या मार्चमध्ये या चारही विषयांची फेर परीक्षा देत चारही विषयांमधे यश संपादन केले आहे. 1996 मध्ये दहावी परीक्षा दिल्यानंतर थेट 2020 मध्ये ते परीक्षेला बसले. तब्बल 24 वर्षांनी परिक्षेला बसले असतानाही त्यांनी न सुटलेले चार विषय सोडविले. 

कदम यांनी मराठी विषयात 62 गुण, इंग्रजीमध्ये 44, गणित विषयात 49 आणि समाजशास्त्र मध्ये 67 गुण मिळविले आहेत. दहावी उत्तीर्ण होण्याच्या इच्छेला वयाची आडकाठी न आणता कदम यांनी 44व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याने कदम यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागासह सर्वस्तरातून कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 24 years, he passed the matriculation examination