कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संबंधितावर होणार सिंधुदुर्गनगरीतच होणार अंत्यसंस्कार

विनोद दळवी
Saturday, 12 September 2020

जिल्ह्यात आणखी 75 व्यक्तीचे कोरोना अहवाल बाधित आले.

ओरोस : (जि. सिंधुदुर्ग) : कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ते पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार नाही. सिंधुदुर्गनगरी येथील प्राधिकरणच्या असलेल्या स्मशानभूमीत त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी येणारा खर्च प्राधिकरण निधीतून करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे दिली.

ते म्हणाले, ``यासाठी आवश्‍यक नियोजन प्राधिकरण समिती अध्यक्ष नियोजन करणार आहेत. यामुळे कोरोना बळी ठरलेल्या नातेवाईकांची होणारी परवड थांबणार आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर 1.25 तर कोरोनामुक्तीचा दर 57 टक्के आहे. मृत्यू दर राज्याच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात सध्या ऑक्‍सिजनचा साठा पुरेसा आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात आणखी 75 व्यक्तीचे कोरोना अहवाल बाधित आले. त्याने एकूण बाधित संख्या दोन हजार 249 झाली आहे. जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. आणखी 50 जणांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 153 झाली आहे.
 
जिल्ह्यात गुरुवारी दुपारी बारापर्यंत एकूण बाधित संख्या दोन हजार 174 होती. आज दुपारी बारापर्यंत नवीन 336 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 261 अहवाल निगेटिव्ह होते, अशी माहिती शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांनी दिली. 

जिल्हा कोरोना चाचणी केंद्राला नव्याने 433 नमुने आले. त्यामुळे नमुन्यांची संख्या 19 हजार 44 झाली. यातील 18 हजार 669 अहवाल आले. 375 प्रलंबित आहेत. एक हजार 61 रुग्ण सक्रिय आहेत. जिल्ह्यात संस्थात्मक क्वारंटाईनमधील सात हजार 826 व्यक्ती कालावधी पूर्ण झाल्याने आज घरी परतल्या. त्यामुळे तेथे आता 13 हजार 179 जण आहेत. 45 व्यक्ती घरी गेल्याने गाव पातळीवरील क्वारंटाईन संख्या आठ हजार 652 आहे. नागरी क्षेत्रात तब्बल सात हजार 781 व्यक्ती कमी झाल्याने तेथे चार हजार 527 व्यक्ती आहेत. 

विनायक राऊत कोरोना पॉझिटिव्ह 
खासदार विनायक राऊत यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपली प्रकृती एकदम ठीक असल्याचे श्री. राऊत यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले. ते लवकरच बरे होऊन जिल्हावासीयांच्या सेवेत पुन्हा रुजू होतील, असे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the death due to corona, the funeral will be held in Sindhudurganagari