esakal | आता फक्त चिंगळांचाच आधार
sakal

बोलून बातमी शोधा

after four days start rain and fisherman face problems for fishery in ratnagiri

ऑगस्टमध्ये मच्छीमार बंदी उठली. पण मच्छीमारांना निसर्गाची साथ मिळाली नाही

आता फक्त चिंगळांचाच आधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली आहे. त्याचा परिणाम मच्छीमारीवर होत आहे. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यामुळे काही मच्छीमार धोका पत्करून समुद्रात जातात. ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांना चिंगळांचा आधार आहे. 

हेही वाचा - सावंतवाडी तालुक्याला पुन्हा धक्का, दोघे शिक्षक कोरोना बाधित...

ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. कोकणच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तविली आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचे संकेत दिले आहेत. त्यानुसार सोमवारी दिवसभर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झालेली आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी १०.२१ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड ८.३०, दापोली ८.९०, खेड १६.९०, गुहागर १०.१०, चिपळूण ३.७०, संगमेश्वर १७.२०, रत्नागिरी ९, राजापूर ६.७०, लांजा ११.१० मिमी पावसाची नोंद झाली.

ऑगस्टमध्ये मच्छीमार बंदी उठली. पण मच्छीमारांना निसर्गाची साथ मिळाली नाही. चौथ्या दिवशीच वादळाला सुरवात झाली. पुढे चार दिवस मच्छीमार नांगर टाकून बंदरातच उभे होते. वादळाचा जोर शुक्रवारपर्यंत होता. शनिवारी 8 ऑगस्टला विश्रांती घेतल्यानंतर मच्छीमारांनी धाव घेतली. १५ वावापर्यंत प्रत्येक नौकेला मिळून दीडशे ते दोनशे किलो चिंगळं मिळत होती.

हेही वाचा -  आंदोलने झाली, आश्वासने मिळाली, तरीही दुर्लक्षच! काय आहे हेवाळेची व्यथा? 

व्यापाऱ्यांकडून चिंगळांना किमान दोनशे ते अडीचशे रुपये दर दिला जात आहे. काही व्यापारी दर पाडून मागत असल्याने मच्छीमार त्रस्त आहेत. डिझेलचा खर्च, खलाशांचा पगार, देखभाल दुरुस्ती यावरील खर्च आणि मासळी विक्रीतून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. तरीही खलाशांचा खर्च अंगावर पडू नये यासाठी मच्छीमार पाऊस असतानाही सध्या समुद्रावर स्वार होत आहेत. गुहागर तालुक्‍यात अंजनवेल येथे नौका बुडाल्यानंतर काही मच्छीमार धास्तावले आहेत. सध्या वीस टक्‍केच मच्छीमार समुद्रात जात आहेत.

"कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. सध्या मिळणाऱ्या मासळीतून पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही. ना नफा, ना तोटा तत्त्वावर सध्या मासेमारी व्यवसाय सुरू आहे."

- आप्पा वांदरकर, मच्छीमार

संपादन - स्नेहल कदम 

loading image