रत्नागिरी : शिक्षकच नसल्याने ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

संगमेश्वर - वारंवार मागणी करुनही शाळेत शिक्षक मिळत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शृंगारपूर (ता. संगमेश्वर) येथील आदर्श केंद्र शाळेला ग्रामस्थांनीच टाळे ठोकले. हा प्रकार समजताच मध्यस्थीसाठी गेलेल्या केंद्रप्रमुखाना आक्रमक ग्रामस्थांनी काढता पाय घ्यायला लावला. 

संगमेश्वर - वारंवार मागणी करुनही शाळेत शिक्षक मिळत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शृंगारपूर (ता. संगमेश्वर) येथील आदर्श केंद्र शाळेला ग्रामस्थांनीच टाळे ठोकले. हा प्रकार समजताच मध्यस्थीसाठी गेलेल्या केंद्रप्रमुखाना आक्रमक ग्रामस्थांनी काढता पाय घ्यायला लावला. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श केंद्र शाळा शृंगारपूर ही जिल्हा परिषद मार्फत चालवली जाते. सातवीपर्यत असणाऱ्या या शाळेची पटसंख्या 41 आहे. या शाळेसाठी चार शिक्षक मंजूर आहेत. यात पदवीधर शिक्षकाचाही समावेश आहे. या शाळेत यावर्षीच्या जूनपासुन केवळ 2 शिक्षक कार्यरत होते. यात पदवीधर शिक्षक नसल्याने तो देण्यात यावा यासाठी ग्रामस्थ शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत होते. 
गणपती सुट्टीच्या आधी येथील 2 कार्यरत शिक्षकांची बदली झाली. त्यामुळे सुट्टी लागण्यापूर्वी आजूबाजूच्या दोन शाळांमधील शिक्षक तात्पुरते येऊन मुलाना शिकवत होते. त्यानंतर सुट्टी पडली. गणपतीची सुट्टी संपल्यानंतर शाळेत एकही शिक्षक हजर झाला नाही. यामुळे शाळा सुरु होवूनही मुले रिकामी बसत होती. ग्रामस्थांनी दोन दिवसापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत वस्तुस्थिती सांगितली मात्र तिथून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आज सकाळी शाळेलाच कुलूप ठोकले. 

हा प्रकार समजताच सकाळी साडे अकरा वाजता शृंगारपुर केंद्राचे प्रमुख महेश जाधव एक शिक्षक घेऊन गेले. त्यांनी आज एक शिक्षक हजर करत आहोत. सोमवारी दुसरा शिक्षक हजर करतो असे सांगून हे आंदोलन मागे घ्या अशी विनंती केली. मात्र आक्रमक ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. आज शाळा बंद केल्यावर तुम्हाला जाग आली का ? असा सवाल केला. दोन्ही शिक्षक एकाचवेळी हजर करा तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामस्थांची आक्रमक भूमिका पाहून केंद्रप्रमुख आल्या पावली रिकाम्या हाताने माघारी गेले. 

आम्हीच दोन शिक्षकाना शाळेत आणले 

येथे पदवीधर शिक्षक नसल्याने मुलांचा अभ्यासक्रम बराच मागे राहिल्याचे पालकांनी सांगितले. ज्या वेळी दोन कार्यरत शिक्षक गेले त्यावेळी शाळेत कुणीही नसताना प्रशासनाने इकडे लक्ष दिले नाही. आम्हीच दोन शिक्षकाना विनंती करून शाळेत आणल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आज घडलेल्या प्रकारामुळे आता शिक्षण विभाग नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agitation for Teacher in Srungarpur in Sangmeshwar Taluka