esakal | त्या गैरवर्तनाविरूद्ध कृषी सहाय्यक आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

गैरवर्तन

त्या गैरवर्तनाविरूद्ध कृषी सहाय्यक आक्रमक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : येथील तालुका कृषी कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कृषी पर्यवेक्षकाकडून तालुक्यातील महिला कृषी सहाय्यकांशी गैरवर्तन करुन विनाकारण मानसिक त्रास दिला जात आहे. हा प्रकार गेली कित्येक दिवस सुरु असुन त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जावी, अन्यथा काम बंद आंदोलन छेडू, असा इशारा आज सर्व महिला कृषी सहाय्यकांनी सभापती सौ. निकीता सावंत यांची भेट घेत दिला.

या गंभीर प्रकाराची दखल घेत सभापती सौ. सावंत यांनी संबंधितावर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा त्याला कार्यालयात बसू देणार नाही, असे जिल्हा कृषी अधिकारी यांना फोनवरून सुनावले.

तालुका कृषी कार्यालयात अलीकडेच एक अधिकारी अन्य ठिकाणाहून बदली होवून येथे रुजू झाला आहे. या अधिकाऱ्याकडून तालुक्यातील सहा गावात कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यक महिलांना मानसिक त्रास देत त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रकार सुरु असल्याचा संबंधितांचा आरोप आहे. अलीकडे झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर यांनी या मुद्याला हात घालत संबंधितावर कारवाईची मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात एका महिला कृषी सहाय्यकाने तक्रार केल्याचेही समोर आणले होते.

या प्रकारानंतर सभागृहाने संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. यावेळी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून संबंधितांच्या बदलीबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितले होते; मात्र आजपर्यंत संबंधितावर कुठलीही कारवाई न झाल्याने आज अखेर तालुक्यातील 13 महिला कृषी सहाय्यकांनी सभापती सौ. सावंत यांची भेट घेतली. यावेळी उपसभापती शीतल राऊळ, माजी सभापती पंकज पेडणेकर, मानसी धुरी, सदस्य संदीप नेमळेकर आदी उपस्थित होते.

यावेळी जोपर्यंत त्या कृषी पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. या प्रकाराची सभापती सौ. सावंत यांनी दखल घेत जिल्हा कृषी विभागाने त्या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा त्यांना कार्यालयात बसू देणार नाही अशी भूमिका घेतली. पंचायत समिती सदस्यांनी त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे असा आक्रमक पवित्रा घेतला.

संबंधित अधिकाऱ्याच्या बाबतीत अनेक तक्रारी आहेत. उध्दट उत्तरे देणे असे प्रकार केले जात असल्याचे उपस्थित महीला कृषी सहाय्यकानी सांगितले. याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे; परंतु त्याच्यात कोणताही बदल झाला नाही. सहकारी महिलांशी गैरवर्तन करण्याचे प्रकार सुरूच आहेत. याबाबत तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली; परंतु कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा तसेच संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपण काम बंद आंदोलन करू, असेही त्या म्हणाल्या.

loading image
go to top