शेतकऱ्यांनो कृषी योजनांसाठी मिळाली मुदतवाढ ; ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासन कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत शासनातर्फे वाढवण्यात आली असून ती आता 10 जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे. तरी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 

कृषी विभाग योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती. सध्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे. विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांना आवश्‍यक असणाऱ्या विविध बाबींसाठी एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. वारंवार कागदपत्रे देण्याची गरज नाही. आपल्याला आवश्‍यक असणाऱ्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरवून नोंदणी करावी. लाभार्थी निवड ही नियमाप्रमाणे सोडत पद्धतीने होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी त्वरित अर्ज करावा.

हेही वाचा - चिपळुणातील 22 ग्रामपंचायती बिनविरोध

पुढील वर्षभराच्या कालावधीत जाहीरात येणार नाही, असे गृहीत धरून एकदा सर्व आवश्‍यक बाबीचे अर्ज करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना आकार देणे, फळबाग लागवड, मधुमक्षिकापालन, हरितगृह, शेडनेट हाउस, प्लास्टिक मल्चिंग, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा लागवड तसेच इतर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्‍टर व पॉवर ट्रेलर चलीत अवजारे प्रक्रिया संच, पॉवर टिलर, बैलचलित अवजारे, मनुष्य अवजारे, स्वयंचलित अवजारे, कापणी यंत्र, नांगर पेरणी यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मोटार पंप, डिझेल इंजिन, वैयक्तिक शेततळे, शेतातील शेततळेमध्ये प्लास्टिक मल्चिंग, सामूहिक शेततळे आदींचा योजनेत समावेश आहे. 

सोडत पद्धतीने निवड 

या पुढील काळात म्हणजे मार्च 2022 पर्यंत आवश्‍यक असलेल्या योजनांचे सर्व अर्ज भरून सध्या आवश्‍यकता असलेल्यांना मार्च 2022 पर्यंत लागणाऱ्या बाबींना एक पासून दहा पर्यंतचे प्राधान्य क्रम विकल्प द्यावेत. सर्व लाभार्थींची निवड नियमानुसार सोडत पद्धतीने होणार आहे. सातबारा, आठ अ, बॅंक पासबुक, आधार कार्ड लागणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर लवकरात लवकर नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.  

हेही वाचा - पैशाशिवाय निवडणूक नाही, यंदा मात्र खर्च वाचला

 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture policy date increase for farmers in sindhudurg online application done