तरुणांना शेतीची ओढ..अनेकांनी निवडले करियर म्हणून

अमित गवळे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पाली - एकविसाव्या शतकातील तरुणाई विविध क्षेत्रात आपले करियर करत आहेत. मात्र अजुनही काही तरुणांनी आपल्या मातीशी प्रेम व नाते घट्ट धरुन ठेवले आहे. रायगड जिल्ह्यात अनेक तरुणांनी शेतीला करियर म्हणून निवडले आहे. ते आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर, व्यापारी व नगदी पिके, सेंद्रिय शेती अशा विविध प्रकारे शेतीत नवनवीन प्रयोग ते करत आहेत..

पाली - एकविसाव्या शतकातील तरुणाई विविध क्षेत्रात आपले करियर करत आहेत. मात्र अजुनही काही तरुणांनी आपल्या मातीशी प्रेम व नाते घट्ट धरुन ठेवले आहे. रायगड जिल्ह्यात अनेक तरुणांनी शेतीला करियर म्हणून निवडले आहे. ते आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर, व्यापारी व नगदी पिके, सेंद्रिय शेती अशा विविध प्रकारे शेतीत नवनवीन प्रयोग ते करत आहेत..

वडिलोपर्जित शेती असलेले अनेक सुशिक्षीत व नोकरदार तरुण आपला नोकरीधंदा व शिक्षण सांभाळून शेतीची कामे देखिल करत आहेत. त्यामध्ये प्रा. सुहास पाटील,  अमरीश नेमाणे, प्रशांत भोजने,गोरेगाव, (आयटी) पुण्यात, गणेश पवार, नयन नटे,  अविनाश गोपाळ, मंगेश मांढरे असे असंख्य तरुण आपला नोकरीधंदा, व्यवसाय व शिक्षण सांभाळून शेतीमध्ये हातभार लावत आहेत.

अलिबाग तालुक्यातील अॅड. राकेश पाटील यांनी सकाळला सांगितले की व्यवसाय सांभाळून शेतीची कामे देखिल करतो.. स्वतः नांगर चालवितो, लावणी, झोडणी अशी सर्व शेतीची कामे करतो. निसर्गाने शिकवलेली नवनिर्माण करण्याची प्रेरणा खूप काही शिकवून जाते. तर सध्या उरण येथे मर्चंट नेव्हिचे शिक्षण घेत असलेल्या पुनित पाटील या युवकाने सांगितले की अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावात शेतीच्या कामासाठी आवर्जुन येतो. लहानपणापासूनच शेतीची सर्व कामे करतो. खुप आनंद व मजा येते असे त्याने सांगितले. तर सुधागड तालुक्यातील वाघोशी येथील एम.ए. बिएड  झालेला अभिजित देशमुख हा तरुण देखिल शेतीत विविध प्रयोग करुन उदर्निवाह करत आहेत.

सुधागड तालुक्यातील उद्धर येथील तुषार केळकर हा तरुण वडिलोपर्जीत अडिच एकर जमिनीवर सेंद्रिय शेती व इकोटुरिझम करत आहे. यासाठी "आत्मतृप्ती" हा प्रोजेक्ट सुरु केला. सुरुवातीस जमिनीची चांगली मशागत करुन मग तिची सुपिकता वाढविली. आर्थिक गणिते जुळविली. सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून विविध प्रकारच्या फळ व पाले भाज्या तसेच फुलांचे उत्पादन घेत आहे. याबरोबरच इकोफ्रेंडली घरे बांधणे, मातीच्या चुली बनविणे, सोन खत व कंपोष्ट खत तयार करणे, पावसाळी सहलींचे आयोजन करणे, रानभाज्या महोत्सव असे विविध उपक्रम राबवितो. आत्ता पर्यंत २२ देशांचे नागरीकांनी येथे येवून या विवीध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच प्रत्यक्ष शेतीच्या कामांचा स्वतः अनुभव घेतला आहे. दुरदर्शन, आकाशवाणी व वृत्तपत्रांनी देखिल त्याच्या कामाची दखल घेतली आहे. यासर्व कामात तुषारची पत्नी आकांशा, आई-वडील व ग्रामस्थांचे खूप सहकार्य लाभते. याच क्षेत्रात विवीध प्रयोग करुन इतर तरुणांना देखिल मार्गदर्शन करत आहे.

खोपोली येथे राहणारे योगिनी व रितेश शिंदे या उच्च शिक्षीत इंजिनियर तरुण दाम्पत्यांनी शाश्वत विकासासाठी इकोटुरीझ सुरु केले. खालापुर तालुक्यातील खानाव गावाजवळ दिड एकर जागेवर"आजोळ दि व्हिलेज होमस्टे" हा प्रकल्प सुरु केला.  यामध्ये त्यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रातील फळ व फुलझाडांची लागवड केली आहे. रितेश व योगिनी हे दोघेही अमेरिकेला नामांकित कंपन्नीमध्ये कार्यरत होते.  शहराच्या धकाधकीच्या जिवनापेक्षा खेड्यात राहुन शुद्ध हवा घ्यावी असे त्यांना वाटले.. याबरोबरच काही घरगुती कारणांमुळे त्यांनी अमेरिका सोडली. खालापुर येथील खानाव जवळ असलेल्या माळरान जागेवर मशागत केली. दोघांनीही शेती व फळ-फूल झाडांचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळविले. रागिनी यांनी वॉटर अॅन्ड नॅचरल रिसोर्स व्यवस्थापनाचा अॅडव्हान्स डिप्लोमा देखिल केला. सुरुवातीस चुकत चुकत व अनुभव घेत काम केले.. मातीचे व पाण्याचे संवर्धन केले. फळ व फुल झाडे लावली. अनेकांनी या ठिकाणी भेट देवुन या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच योगिनी या ग्रामिण भागातील महिलांनी केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ देखिल मिळवून देतात.

पिलोसरी येथे ३० गुंठ्यात पॉली हाऊस उभारुन २०१६ पासून फुलशेती सुरु केली. यामध्ये जरबेराचे उत्पादन घेत आहे. तसेच आंतरपिक म्हणून भाजी आणि शेततळ्यातुन मत्सशेती देखिल करत आहे. फुलांना मुंबई व पुण्यामध्ये चांगली मागणी आहे.
नितिन केदारी. तरुण शेतकरी, पिलोसरी (सुधागड)

बीकॉम केल्यावर एक दोन वर्ष नोकरीच्या शोधात भटकंती केली. मग मात्र नोकरीच्या मागे न धावता शेती करण्याचे ठरविले. मागील आठ वर्षांपासून स्वतःची तीन एकर शेती आणी त्याबरोबरच इतरांच्या शेती भाडेत त्वार घेवून त्यावर आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करत आहे.  कडधान्ये, फळभाजीपाल्याचे भरघोष उत्पादन घेतो..आंबा बागायत देखिल करतो. मागील वर्षी रायगड प्रेस क्लबचा कृषी क्षेत्रातील पुरस्कार मिळाला तर यंदा रायगड जिल्हा परिषदेचा कृषीरत्न पुरस्कार मिळाला आहे. शेती व आंबा बागायतीमधून वर्षाला पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पादन मिळते
रोहन वसंत साळवी, रायगड जिल्हा कृषीरत्न पुरस्कार प्राप्त तरुण शेतकरी, गोरेगाव-माणगाव

स्वतःचा व्यवसाय सांभाळून वाफेघर येथील शेतीमध्ये इकोटुरीझम करत आहे. शेती बरोबरच जोडधंदा म्हणून गोट फार्मिंग सुद्धा केले आहे. शेतीसारखा दुसरा कोणाता शाश्वत व्यवसाय नाही. तरुणांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करुन आपला उत्कर्ष साधावा. 
परेश शिंदे, पाली, (अभियांत्रिकी पदविका)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture for the youth, Many as chosen careers