हिंदू महासभेचे अजिंक्‍य गावडे काँग्रेसबरोबर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

रत्नागिरी - हिंदू महासभेच्या एबी फॉर्ममधील तांत्रिक त्रुटींमुळे पक्षाकडून रिंगणात उतरलेल्या अजिंक्‍य गावडेंना अपक्ष म्हणून राहावे लागले; मात्र त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याऐवजी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठिंबा देत असल्याचे रत्नागिरीत पत्रकार परिषदेत जाहीर केले.

रत्नागिरी - हिंदू महासभेच्या एबी फॉर्ममधील तांत्रिक त्रुटींमुळे पक्षाकडून रिंगणात उतरलेल्या अजिंक्‍य गावडेंना अपक्ष म्हणून राहावे लागले; मात्र त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याऐवजी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठिंबा देत असल्याचे रत्नागिरीत पत्रकार परिषदेत जाहीर केले. निवडणूक आयोगाकडूनच हिंदू महासभेच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस भवन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर, अशोक जाधव, राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये आदी उपस्थित होते. गावडे म्हणाले, हिंदू महासभेतर्फे उमेदवारी अर्ज भरला होता. तांत्रिक कारणामुळे पक्षाचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात राहावे लागेल. काँग्रेसचे नेते अशोक जाधव यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि काँग्रेसला पाठिंबा द्या, असे सांगितले. हिंदू महासभेच्या चिन्हावरच उभे राहायचे होते, स्वतंत्र उभे राहण्यात रस नव्हता. त्यामुळे सर्वधर्मसमभाव राखणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भाजप-शिवसेना यांना माझा कट्टर विरोध आहे. देशाला काँग्रेसची गरज आहे. 

तांत्रिक कारणाबाबत विचारले असता ते म्हणाले, हिंदू महासभेचे अर्ज स्वीकारू नयेत, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली होती. या तांत्रिक कारणाने अपक्ष राहावे लागले. राज्यात रायगड, सातारा आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी अर्ज भरले होते. त्यातील रत्नागिरीतून मी अर्ज मागे घेत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मागील निवडणुकीत रिंगणात असलेल्या हिंदू महासभेच्या उमेदवाराला रत्नागिरी-सिंधुदुर्गातून चांगली मते मिळाली होती. त्याच धर्तीवर आम्ही लोकांपर्यंत बांदिवडेकरांचा प्रचार करू.

पक्षाच्या विचारधारेला बळकटी - बांदिवडेकर
काँग्रेस पक्षाची ताकद वाढत आहे. पक्षाच्या विचारधारेला बळकटी मिळत आहे. २३ एप्रिलपर्यंत या मतदारसंघातील काँग्रेस आघाडीची ताकद निश्‍चितच वाढणार आहे. त्याचे रूपांतर विजयात होईल, असा विश्‍वास काँग्रेसचे उमेदवार बांदिवडेकर यांनी व्यक्‍त केला. पाठिंबा देणाऱ्या अजिंक्य गावडे यांचे त्यांनी स्वागतही केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Gawde of Hindu Mahasabha with Congress