प्रशासनाला ठेंगा..चक्क तेरेखोल नदीतून बेकायदा दारू वाहतूक

निलेश मोरजकर
रविवार, 5 एप्रिल 2020

रात्री वाळू उत्खनन करणाऱ्या होड्यांमधून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू येत आहे. 

बांदा (सिंधुदुर्ग) - देशात लॉकडाऊन आहे. यामुळे बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्यांनाही चाप बसला. सिंधुदुर्ग-गोवा सीमा सील असल्याने व्यावसायिकांनी दारू वाहतूक करण्यासाठी चक्क तेरेखोल नदीचा वापर सुरु केला आहे. नदी दोन्ही राज्यांच्या सीमेवरून वाहते. रात्री वाळू उत्खनन करणाऱ्या होड्यांमधून गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारू येत आहे. 

गोवा बनावटीची दारू अंधाराचा फायदा घेत जिल्ह्यात वितरित होते. लॉकडाऊनमुळे गोव्यातील मद्यालये बंद असल्याने चोरट्या पद्धतीने जिल्ह्यात आणण्यात येणारी कास, मडुरा, शेर्ले, बांदा मार्गे ठिकठिकाणी पाठविण्यात येते. ती 30 टक्के चढ्या किमतीने विकली जात आहे. 
बांदा पोलिसांनी सिंधुदुर्ग-गोवा सीमा सटमटवाडी येथे तर गोवा पोलिसांनी पत्रादेवी येथे सीमा सील केली आहे. शहरातून जाणारा जुना मुंबई-गोवा महामार्ग देखील सील आहे. जिल्ह्यातून गोव्यात जाणारी व गोव्यातून जिल्ह्यात येणारी वाहतूक पूर्णपणे रोखली आहे. गोव्यातील मद्यालये लॉकडाऊन आहेत. जिल्ह्यात दारूचा पुरवठा बंद झाल्याने तळीरामांची पंचाईत झाली आहे. त्यावर उपाय म्हणून 

दारू व्यावसायिकांनी तेरेखोल नदीतील जलमार्गाचा वापर केला आहे. ओहोटीच्या वेळा पाहून नदीपात्रातून गोव्यातून सिंधुदुर्गात दारूची दररोज मध्यरात्री 12 ते 2 या वेळेत वाहतूक होते. किनाऱ्यावर तैनात गाड्यांमधून दारू जिल्ह्यात वितरित होते. यामध्ये मोठी साखळी कार्यरत आहे. 
तेरेखोल नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खननासाठी परप्रांतीय कामगार व होड्यांचा वापर करण्यात येतो. वाळू उत्खनन बंद असल्याने होड्यांचा वापर दारू वाहतुकीसाठी होत आहे.

परप्रांतीय कामगारांचाही वापर होतो. कामगारांना प्रत्येक खेपेमागे पैसे देण्यात येतात. या साऱ्या प्रकाराबाबत बांदा पोलीस अनभिज्ञ असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांना रस्त्यावर फिरण्यास बंदी आहे; मात्र दारू वाहतूक सुरू आहे. दरम्यान यासंदर्भात बांद्याचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

दारू वाहतुकीसाठी तेरेखोल नदीत जलमार्गाचा वापर सुरू केल्याने बांदा पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाऊनमुळे दारू व्यावसायिकांनी नवीन शक्कल लढविली आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊन पोलिसांच्या मदतीने निश्‍चितच कारवाई करण्यात येईल.
- राजाराम म्हात्रे, तहसीलदार, सावंतवाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol transport terekhol river konkan sindhudurg