खबरदारी! तिघे विदेशी उतरताच घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

आरोग्य तपासणीमध्ये कुणी संशयित आढळला, तर त्याला विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे.

कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली शहरात रेल्वे स्थानक, आराम बस मार्गे आलेल्या तिघा विदेशी पर्यटकांना पोलिस आणि आरोग्य प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. या तिघांचीही रवानगी विलगीकरण कक्षात केली असून, तेथे त्यांना 14 दिवस ठेवले जाणार आहे. याबाबतची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी आज दिली. 

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलिस, आरोग्य, तसेच इतर विभागांच्या माध्यमातून सतर्कता बाळगली जात आहे. त्याअनुषंगाने आज कणकवली रेल्वे स्थानकात उतरलेल्या दोघा विदेशी पर्यटकांना ताब्यात घेण्यात आले. यात एक युवक इंडोनेशियातून, तर दुसरा ऑस्ट्रेलियातून आला होता. याखेरीज शहरालगतच्या एका हॉटेलमध्ये इराणी व्यापारी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या तिघांनाही कणकवली शहरात स्थापन केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. शहरातील एक हॉटेल ताब्यात घेऊन तेथे विलगीकरण कक्ष स्थापन केल्याचेही त्या म्हणाल्या. 

कणकवली, वैभववाडी, नांदगाव येथील रेल्वे स्टेशन, तसेच कणकवली, तळेरे, फोंडाघाट येथील बसस्थानके, सर्व पोलिस चेकनाके या ठिकाणी पोलिस, महसूल आणि आरोग्य विभागाची पथके तैनात आहेत. तेथे होणाऱ्या आरोग्य तपासणीमध्ये कुणी संशयित आढळला, तर त्याला विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. तत्पूर्वी त्या प्रवाशांची आरोग्य तपासणी आणि प्राथमिक चाचण्या केल्या जात असल्याचीही माहिती प्रांताधिकाऱ्यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alert in kankavli because coronavirus