कर्जमाफी 20 हजार कोटींपर्यंतच?

सुभाष म. म्हात्रे
मंगळवार, 4 जुलै 2017

अध्यादेशात बदल होण्याची शक्‍यता

अध्यादेशात बदल होण्याची शक्‍यता
अलिबाग - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करताना ती 34 हजार कोटींची असेल असे सांगितले गेले होते; मात्र कर्जमाफीसाठीच्या निकषांबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशात काही त्रुटी दाखवत काही राजकीय पक्ष तसेच जिल्हा बॅंकांनी विविध सूचना केल्या आहेत. त्या सूचनांमुळे सुधारित निकषांसह अध्यादेश निघण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम 20 हजार कोटींपर्यंतच असू शकेल, अशी शक्‍यता जिल्हा बॅंकांतील सूत्रांनी वर्तवली आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत काही निकषही ठरवण्यात आले. त्याबाबतचा अध्यादेश 28 जूनला काढण्यात आला; मात्र तो काढण्यापूर्वी सरकारने पुरेसा अभ्यास न केल्याचे राजकीय पक्ष तसेच जिल्हा बॅंकांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्ष तसेच जिल्हा बॅंकांनी केलल्या सूचनांवर विचार करून राज्य सरकार अध्यादेशात बदल करण्याची शक्‍यता आहे. हा अध्यादेश लवकरच जारी होऊ शकतो, असे सहकार विभागाच्या अलिबाग येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी 1 जुलैला राज्यातील जिल्हा बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

अध्यादेशाबाबतच्या सूचना सरकारला कराव्यात, असे आवाहन देशमुख यांनी संबंधितांना केल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.

तातडीच्या मदतीला विलंब?
दरम्यान, हा सुधारित अध्यादेश जारी होण्यास काही दिवस जाऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच खरिपासाठी 10 हजार रुपयांची तातडीची मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alibag konkan news loanwaiver to 20000 crore