सर्वच पक्षांचे ‘तळ्यात-मळ्यात’

- सचिन माळी
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मंडणगड - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्या, तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व आंबेडकरी विचारधारेतील पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्‍यात राजकीय पक्षांची भूमिका तळ्यात-मळ्यात अशीच आहे. यामुळे मतदार संभ्रमात आहेत.

मंडणगड - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्या, तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व आंबेडकरी विचारधारेतील पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्‍यात राजकीय पक्षांची भूमिका तळ्यात-मळ्यात अशीच आहे. यामुळे मतदार संभ्रमात आहेत.

मंडणगड नगरपंचायत झाल्याने तालुक्‍यात २ जिल्हा परिषद गट व ४ गण उरले. त्यामुळे अनेक इच्छुकांना फटका बसला. आघाडी-युतीबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. सद्यःस्थितीत सर्वच पक्षांचा स्वबळाचा नारा आहे; मात्र खरी लढत राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यात रंगणार आहे. काँग्रेसने सन्मानपूर्वक हाथ पुढे केला आहे. आमदार संजय कदम काय निर्णय घेतात, याकडे तालुक्‍याचे लक्ष आहे. शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू आहे. सूर्यकांत दळवी यांच्या भूमिकेवर सेनेची वाटचाल अवलंबून राहील. 

भाजपने सर्वांसाठी प्रवेशाची दारे खुली ठेवली आहेत. गेल्या निवडणुकीत तालुक्‍यात शिवसेनेला जिल्हा परिषदेची एकही जागा जिंकता आली नाही. पक्षांतर्गत कलहातून हा बालेकिल्ला राष्ट्रवादीकडे गेला. पंचायत समितीत सध्या सहापैकी पाच सदस्य शिवसेनेचे आहेत. नव्याने निर्माण झालेले शिरगाव व उमरोली जिल्हा परिषद गट तसेच देव्हारे, उमरोली, भिंगळोली, शिरगाव पंचायत समिती गणात शिवसेनेने ताकद एकवटली आहे.

पक्षांतर्गत मतभेद मिटल्यास त्याचा फायदा थेट सेनेच्या उमेदवारांना होईल; मात्र नेतृत्व कोणाकडे, यावर घोडे अडले आहे. वर्षभरात राष्ट्रवादीने विकासकामांच्या माध्यमातून गावागावात मुसंडी मारली आहे. तालुक्‍यातील आंबेडकरी विचारधारेतील आरपीआय, बसपा, बीआरएसपी, भारिप पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. ते प्रत्यक्षात उतरले तर तालुक्‍यातील राजकारणावर याचा मोठा परिणाम दिसून येईल. 

अस्थिरता संपलेली नाही...
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची आचारसंहिता लागून मिनी मंत्रालयाच्या रणसंग्रामाचा बिगुल वाजला असला, तरी बंडाळी गटबाजीच्या ग्रहणांमुळे सर्वच राजकीय पक्षात निर्माण झालेली अस्थिरता अद्याप संपलेली नाही. सर्वच पक्षांनी उमेदवार निश्‍चित केले तरी जाहीर केले जात नाहीत. उमरोली गट व भिंगळोली गणात बंडखोरी होण्याच्या शक्‍यतेने सहा जागांच्या उमेदवार निवडीचे कोडे कुठल्याही राजकीय पक्षांनी सोडवलेले नाही. उमेदवार घोषणेनंतर होणारे नाराजी नाट्य, त्यातून आयत्यावेळी प्रकट होणारा विरोध टाळण्याकडे साऱ्यांचा कल आहे. 

जिल्हा परिषद गट -
शिरगाव - अनुसूचित जमाती
उमरोली - सर्वसाधारण

पंचायत समिती गण -
शिरगाव - सर्वसाधारण स्त्री
भिंगळोली - सर्वसाधारण
उमरोली - सर्वसाधारण
देव्हारे - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री

Web Title: all political partys are confussiong