esakal | निमंत्रण आले तरच दसरा मेळाव्याला जाईन; मुख्यमंत्र्यांची 'या' दोन माजी मंत्र्यावर नाराजी: Anant Geete
sakal

बोलून बातमी शोधा

रामदास कदम,अनंत गीते

निमंत्रण आले तरच दसरा मेळाव्याला जाईन; अनंत गीते

sakal_logo
By
मुझफ्फर खान.

चिपळूण (रत्नागिरी) : मला निमंत्रण आले तर दसऱ्या मेळाव्याला जाईन अशी माहिती माजी खासदार आणि शिवसेना नेते अनंत गीते Anant Geete) यांनी दैनिक सकाळला दिली. माजीमंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) संपर्काबाहेर असल्यामुळे त्यांची भूमिका समजलेली नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. सामान्य शिवसैनिकांना मेळाव्यात प्रवेश नाही. शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, आमदार, महापौर आणि नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. मात्र शिवसेना नेते रामदास कदम आणि अनंत गीते मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही याची चर्चा कोकणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गीते यांच्याशी संपर्क साधला असता मला निमंत्रण आले तर मी मेळाव्याला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले. त्या संदर्भात किरीट सोमय्या यांना अनिल परब यांच्या विरोधात रामदास कदम यांनीच आवश्यक ती माहिती पुरवली असा गंभीर आरोप कदमांवर आहे. दापोलीचे माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी हा आरोप कदम यांच्यावर केला होता. हा आरोप करताना त्यांनी एक ऑडिओ क्लिपही प्रसिद्ध केली. त्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचा दावा केला गेला. हा आपला आवाज नसून हे सर्व आरोप खोटे असल्याचे रामदास कदम यांनी स्पष्ट केले होते.

या आरोपांविरोधात आपण कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलत असल्याचेही कदम यांनी सांगितले आहे. अनिल परब आणि आपले अतिशय चांगले संबंध असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. मात्र, कथित ऑडिओ क्लिपप्रकरणामुळे रामदास कदम यांच्याबाबत शिवसेनेत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे का ?, अशी चर्चा सध्या सुरू आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे रामदास कदम यांना यावेळी दसरा मेळाव्यात बोलावले जाणार की नाही यावर चर्चा सुरू आहे.

पक्षीय पातळीवर कथित ऑडिओ क्लिपची पडताळणीही केली जाणार असल्याची चर्चा आहे. माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्षप्रवेश कार्यक्रमात महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांच्यावर टिका केली होती. राज्यात स्थापन झालेली महाविकास आघाडी आपण मानत नाही. असे जाहीरपणे सांगितले होते. गीते यांच्या या वक्तव्यामुळे भाजपला महाविकास आघाडीच्या विरोधात आयते भांडवल मिळाले. रायगड लोकसभा मतदार संघात गीतेंचा पराभव झाला. रामदास कदम यांना राज्य मंत्रीमंडळात पुन्हा संधी मिळाली नाही त्यामुळे कोकणातील हे दोन्ही नेते राज्याच्या राजकारणापासून बाजूला फेकलेगेले आहेत.

हेही वाचा: राजन जाधव तुम्ही भाजपचे तिकीट मिळवून दाखवाच; अतुल बंगेंचे आव्हान

शिवसेनेत नव्या नेतृत्वाला संधी मिळाली तसेच तीन पक्षाचे नवीन समीकरण निर्माण झाल्यामुळे कोकणातील शिवसेनेचे हे दोघे नेते नाराज आहेत. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात हे नेते नेहमी उपस्थित असतात. मात्र रामदास कदमआणि अनंत गीते यांनी मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घेतल्यानंतर हे दोन नेते दसऱ्या मेळाव्याला उपस्थित राहणार की नाही याची चर्चा सुरू आहे. माजीमंत्री रामदास कदम जामगे (ता. खेड) येथे असल्यामुळे ते संपर्काबाहेर आहेत.

loading image
go to top