अनिकेत नाचणेकरची `पणती` आंतरराष्ट्रीय स्तरावर 

सचिन माळी
Tuesday, 1 December 2020

याबाबत अनिकेत नाचणेकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले, "मुलगी झाली हो', या मालिकेचे प्रमोशन सुरू होते. त्यातच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची माहिती मिळाली. अशा फेस्टिव्हलमध्ये पहिलं पाऊल टाकूया असे विचार येऊ लागले.

मंडणगड ( रत्नागिरी ) - आई-बाबा ओरडायचे की, दिवा आणि पणती घेऊन काय करतोयस? खरेतर त्यांना यात काहीही रस नव्हता. घरच्या बंदिस्त आणि किरकिर किरकिर करणाऱ्या वातावरणात घरचे झोपल्यानंतर लाईट बंद करून रात्रभर जागून "पणती' तयार झाली. ध्रुवतारा क्रिएटर्स, एनडी प्रॉडक्‍शन, संकल्पना, लेखक आणि दिग्दर्शक अशी तिहेरी भूमिका निभावणाऱ्या मंडणगडमधील अनिकेत आनंद नाचणेकर यांच्या "पणती' शॉर्टफिल्मची पिक्रेर (picture) इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. 

याबाबत अनिकेत नाचणेकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले, "मुलगी झाली हो', या मालिकेचे प्रमोशन सुरू होते. त्यातच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची माहिती मिळाली. अशा फेस्टिव्हलमध्ये पहिलं पाऊल टाकूया असे विचार येऊ लागले. एके दिवशी एक कल्पना सुचली. ती कल्पना जशीच्या तशी सत्यात आणि प्रत्यक्षात आणायची ठरवली. माझे घर मातीचे आणि लाल भिंतींचे असल्याने जे पाहिलं होत अगदी तसेच चित्रीकरण केले.

तुटकाफुटका मोबाईल जसा आहे त्यातून शूट करण्याचे ठरवले. खूप दिवस झाले तरी फिल्म तयार होईना. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सामाजिक विषय मांडायचा होता. बघता बघता त्याच मोबाईलमधून शूट करून स्वतःच एडिट करून फिल्म फेस्टिव्हलला पाठविण्यासाठी सज्ज झाल्याचे नाचणेकर म्हणाले. बऱ्याच लोकांना शॉर्टफिल्मबद्दल सांगितले होते, पण कुणीच फिल्मचा विचार केला नाही.

संगीतही मिळत नव्हते. मग स्वतः काहीतरी करायचे ठरवले आणि अखेर पणती ही शॉर्टफिल्म तयार झाली. मात्र कामाच्या व्यापातून शॉर्टफिल्म पाठवायची राहूनच गेली. शेवटच्या दिवशी फक्त चार तास उरले होते. अखेर दत्तप्रसाद गांगण आणि राजेश इंगळे यांच्या मदतीने या शॉर्टफिल्मची गुगल ड्राईव्ह लिंक तयार होत नसल्याने आधी यू ट्यूब चॅनलवर प्रकाशित करीत शेवटच्या काही तासांत फेस्टिवलला पाठवल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी मधुकर विचारे, राजेश इंगळे, दत्तप्रसाद गांगण, पंकज चव्हाण, राज सुगदरे, नदीम देवळेकर, अनिकेत डहाळे, क्षितिज जाधव यांनी मदत केली. 

शॉर्टफिल्म फेस्टिवलचे डायरेक्‍टर चेतनसर आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रसिक मायबापांचे आभार. असेच शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी राहू देत. 
- अनिकेत नाचणेकर 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aniket Nachanekar Panati On International shortfilm Festival