सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी़, नवे २२ रुग्ण

विनोद दळवी
Monday, 31 August 2020

दिवसभरात आणखी 27 व्यक्तींनी कोरोनावर मात केली.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी नव्याने 22 व्यक्तींचा कोरोना अहवाल बाधित आला आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या एक हजार 287 झाली आहे. कणकवली येथील एका वृद्धाचे निधन झाल्याने जिल्ह्याचा मृत्यू आकडा 21 झाला आहे. आणखी 27 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 668 झाली आहे. 

जिल्ह्यात रविवारी (ता.30) तब्बल 156 बाधित आढळले. आज दुपारपर्यंत 172 अहवाल आले. यातील 150 अहवाल निगेटिव्ह तर 22 पॉझिटिव्ह आहेत. काल सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कणकवली तालुक्‍यातील फोंडा गांगोवाडी येथील 60 वर्षीय वृद्धाचे निधन झाले. जिल्ह्यातील हा 21 वा बळी आहे.

जिल्हा चाचणी केंद्राकडे नव्याने 144 स्वॅब आले. त्यामुळे नमुन्यांची संख्या 13 हजार 557 झाली. यातील 13 हजार 453 अहवाल आले आहेत. 104 प्रलंबित आहेत. आज आणखी 27 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 668 व्यक्ती ठणठणीत होऊन घरी परतल्या आहेत. जिल्ह्यात आता 599 रुग्ण सक्रिय आहेत. या सर्वांवर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये सहा हजार 419 व्यक्ती वाढल्या. तेथे 22 हजार 114 जण आहेत. गाव पातळीवर 429 व्यक्ती कमी झाल्या. तेथे 10 हजार 999 जण आहेत. नागरी क्षेत्रात तब्बल चार हजार 267 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 11 हजार 115 झाली आहे. 

जिल्ह्यात 184 कंटेन्मेंट झोन सक्रिय 
जिल्ह्यात नव्याने 964 व्यक्ती दाखल झाल्याने जिल्ह्यात दोन मेपासून दाखल होणाऱ्या व्यक्तीची संख्या दोन लाख 7 हजार 299 आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 184 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत.

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another victim of corona in Sindhudurg district, 22 new patients