घरघंटी, शिलाई मशिन वाटपावरून हंगामा ; शिवसेनेच्याच सदस्यांनीच विचारले अडचणीचे प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

पंचायत समितीत सभापतीपदी शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यातच सभेत शिवसेनेचेच सदस्य पत्रकबाजी करीत असल्याने पक्षाची बदनामी होत आहे

चिपळूण - पंचायत समिती सेस फंडातून वाटप झालेल्या घरघंटी व शिलाई मशिन वाटपावरून पुन्हा एकदा मासिक सभेत हंगामा झाला. सत्तास्थानी शिवसेना असूनही शिवसेनेच्याच सदस्यांनीच अडचणीत आणणारे प्रश्‍न विचारल्याने तालुकाप्रमुख, पंचायत समिती सदस्य प्रतापराव शिंदे भडकले.

हा विषय थांबविण्यात यावा, असे सांगूनही घरघंटीवर चर्चा सुरूच राहिली. त्यामुळे वातावरण गरम झाले. चौकशी अहवाल येईपर्यंत याविषयी चर्चा नको, असे उपसभापतींनी सांगितल्यावर शिंदे काहीसे शांत झाले.

पंचायत समितीत सभापतीपदी शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यातच सभेत शिवसेनेचेच सदस्य पत्रकबाजी करीत असल्याने पक्षाची बदनामी होत आहे. या विषयी वारंवार चर्चा झाली असून, जिल्हास्तरावरून चौकशी सुरू आहे. तरीही शिवसेना सदस्य हा मुद्दा उपस्थित करतात, यामुळे येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत शिंदे भडकले. अनुजा शिंदे यांनी घरघंटीचा मुद्दा मांडला. लाभार्थ्यांनी घेतलेल्या तुलनात्मक दरपत्रकाची पत्रकेच त्यांनी सदस्यांना दिली. या विषयीची चर्चा सुरू असतानाच प्रताप शिंदे म्हणाले, तुमचा मुद्दा रास्त आहे. परंतु या विषयीची चौकशी जिल्हास्तरावरून सुरू आहे. समाजकल्याण अधिकाऱ्यांनी एकदा चौकशी केलेली आहे. गेले चार-पाच महिने एकाच विषयावर सातत्याने चर्चा सुरू आहे. सभापती शिवसेनेचा असल्याने यात पक्षाचीच नाहक बदनामी होते. जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. कोणा लाभार्थ्याच्या वस्तू खराब झाल्या असतील तर त्या संबंधित दुकानदाराने बदलून द्याव्यात. 

गटनेते राकेश शिंदे म्हणाले, यात सभापतींचा विषय नाही. दरपत्रकावर बीडीओंची सही असल्याने त्यांनी खुलासा करणे गरजेचे आहे; मात्र तत्कालीन बीडीओंची बदली झाली. आताच्या बीडीओंनी खुलासा करावा. अनुजा चव्हाण यांनी आपणास बोलू दिले जात नाही सांगून आपला अपमान होत असल्याची खंत व्यक्त केली. सभापती शिंदे म्हणाल्या, चौकशीदरम्यान कोणाला बोलवायचे, हा चौकशी अधिकाऱ्यांचा विषय आहे. सदस्यांनी माझ्याकडे तक्रार केली म्हणून आपण चौकशीवेळी उपस्थित होतो.

हे पण वाचा - ट्रक खरेदीसाठी बोलावून शेतकरी तरुणाला ७० हजारांना लुटले 

पंचायत समितीची बदनामी
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नंदकिशोर शिर्के म्हणाले, या विषयी तीन-चार सभेत तसेच बाहेर वारंवार चर्चा झाली आहे. त्यावर संबंधितांनी खुलासेदेखील केले; मात्र तरीही याच विषयाची चर्चा होत असल्याने पंचायत समितीची जिल्ह्यात बदनामी होते. तुमचे सदस्य ऐकत नसतील तर गटनेत्याला व्हिप काढायला सांगा. यावरून सेना सदस्यांमध्येच शाब्दिक चकमक झाली.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: argument on Allocated from Panchayat Samiti Cess Fund