
राजापूर : प्रतिकूल वातावरण, वादळ आदी कारणांमुळे दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर यावर्षी उशिरा आगमन झाले. मात्र, त्याचवेळी केवळ पांढरी मान आणि शरीराचा अन्य भाग काळा अशी अनोखी रंगछटा असलेल्या करकोचा-कांडेसर (कामऱ्या ढोक) या दुर्मिळ प्रजाती असलेल्या स्थलांतरित पक्ष्यांचे सुमारे तीन वर्षांनंतर राजापूर परिसरात पुन्हा एकदा आगमन झाले आहे. गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये अर्जुना नदीच्या काठावर आणि आडीवरे परिसरामध्ये त्याचे वास्तव्य असून अनेक वर्षानंतर त्यांचे झालेले आगमन पक्षीप्रेमींना सुखावणारे ठरले आहे.
सीगल पक्ष्यांसह अन्य स्थलांतरित पक्ष्यांचे तालुक्याच्या सागरी किनारपट्टीवर दरवर्षी आगमन होते. त्याप्रमाणे करकोचा-कांडेसर या पक्ष्याचेही तालुक्यामध्ये आगमन होत असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. मात्र, मध्यंतरी काही वर्ष या पक्ष्याचे थंडीच्या कालावधीमध्ये तालुका परिसरामध्ये वास्तव्य आढळले नव्हते. मात्र, यावर्षी त्याचे आगमन झाले असून राजापूर शहरासह आडीवरे परिसरामध्ये त्याचे वास्तव्य आढळून येत आहे. त्याचे झालेले आगमन आणि गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी असलेल्या वास्तव्याने पक्षीप्रेमी सुखावले आहेत.
१७ प्रजातींचे दोनशेहून अधिक पक्षी
काही वर्षापूर्वी वनविभागातर्फे पाणपक्ष्यांचे सर्व्हेक्षण मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये विविध प्रकारच्या १७ प्रजातींचे सुमारे दोनशेहून अधिक पक्षी आढळले होते. त्यामध्ये करकोचा-कांडेसर या पक्ष्याचाही समावेश होता. या सर्व्हेक्षणामध्ये करक-पांगरी भागामध्ये घुबडाची दुर्मिळ प्रजाती असलेले पाण्यावरचे घुबड हा पक्षी तर पश्चिम भागामध्ये पांढरा शराटी, वामन खंड्या यांच्यासह करकोचा-कांडेसर या दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या होत्या.
असा आहे करकोचा-कांडेसर पक्षी
करकोचा -कांडेसर पक्ष्याला काही ठिकाणी कामर्या ढोक या नावानेही ओळखले जाते. या पक्ष्याची केवळ पांढरी मान आणि बाकी सर्व शरीर काळेकुळकुळीत अशी विचित्र मात्र, आकर्षक शरीराची रंगसंगती. गिधाडासारखा काहीसा दिसणारा असून हा पक्षी पाणथळी भागामध्ये बहुतांशवेळा वास्तव्याला आढळतो. थव्याने राहण्याऐवजी एकटाच राहण्याला त्याची पसंती असते.
दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांचे तालुक्यात वास्तव्य असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे. येथील निसर्ग पक्ष्यांच्या वास्तव्याला अनुकूल असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे. करकोचा-कांडेसर हा स्थलांतरित पक्षी काही वर्षांनंतर पुन्हा एकदा तालुक्यामध्ये आढळला आहे. पर्यावरणीय स्थिती त्याच्या वास्तव्याला अनुकूल नसल्याने गेली २ वर्षे तो आढळला नसावा.
- धनंजय मराठे, पक्षिमित्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.