गणपतीपुळेत उभारणार आर्टिफिशिअल बंधारा ; प्रवाहाला बसणार आता ‘ब्रेक’

artificial port stand in ganpatipule ratnagiri to break stream of sea in ratnagiri
artificial port stand in ganpatipule ratnagiri to break stream of sea in ratnagiri

रत्नागिरी : गणपतीपुळे किनाऱ्यावरील धूप थांबविण्यासह किनारा सुरक्षा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी एशिअन डेव्हलपमेंट बॅंकेच्या (एडीबी) सहकार्याने आर्टिफिशिअल बंधारा (रिब्स) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्राथमिक सर्व्हे झाला असून, सविस्तर अहवाल करण्यात येत आहे. मंदिराच्या समोर समुद्रातील वेगवान प्रवाहाला ‘ब्रेक’ लावण्यासाठी हा प्रयोग केला जाईल. यापूर्वी मिऱ्या येथे अशा रिब्स टाकण्यात आल्या होत्या.

गणपतीपुळे मंदिर दोन डोंगरांच्या मधोमध असल्यामुळे समुद्रातील दोन्ही बाजूंचे प्रवाह एकाच ठिकाणी येतात. मंदिरासमोरील भागात चाळ निर्माण होतो. हा किनारा पर्यटकांच्या दृष्टीने धोकादायक बनला असून पावसाळ्यात अजस्र लाटा मंदिराच्या द्वारावर धडकत आहेत. भविष्यातील धोका लक्षात घेऊन मेरी टाईम बोर्डाच्या माध्यमातून एडीबीच्या साह्याने उपाययोजना करण्यात येणार आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची भिंत लाटांच्या माऱ्यांनी कोसळली होती. त्या भागाच्या समोर समुद्रात ३०० ते ४०० फूट आतमध्ये आर्टिफिशिअल बंधारा बांधण्यात येणार आहे. बंधारा बांधण्यासाठी वाळू भरलेल्या रिब्स वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून समुद्राच्या लाटांचा वेग कमी करण्यास मदत मिळेल. वेगवान लाटांचा मारा कमी झाल्यामुळे समुद्राची धूप कमी होईल. यासाठी एडीबीने प्राथमिक सर्व्हे केला होता.

समुद्राच्या प्रवाहाची दिशा ठरवण्यात येणार आहे. पावसाळा, उन्हाळा, अमावास्या, पौर्णिमा यावेळी प्रवाहांची दिशा कशी असते हे ठरवण्यात येईल. प्रवाहाची दिशा वेगवेगळी असते. या प्रवाहाचा करंट ब्रेक करण्याचा प्रयत्न रिब्सच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासाठी लागणारी वाळू मालगुंड खाडी येथून घेण्याबाबत मेरी टाईम बोर्डाचा विचार आहे. 

ओहोटीच्या काळात किनाऱ्यावर ही रिब्ज सहजपणे दिसेल अशी ठेवण्यात येणार आहे. या रिब्स बरोबरच स्थानिक व्यावसायिकांना वाळूचे उंच ढिगारे करून त्यावर दुकानगाळे बांधून देण्याचा विचारही सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. आर्टिफिशिअल बंधाऱ्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या योजनेचा एकूण खर्च, कामाचा कालावधी हे त्यावेळी समजू शकणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास गणपतीपुळेकिनारी कृत्रिम किनारा तयार होईल. पर्यटनदृष्ट्या स्कुबा डायव्हिंग किंवा अन्य पर्यटनाशी निगडित व्यवसाय सुरू करता येतील.

"एडीबीच्या सहाय्याने आर्टिफिशिअल बंधारा उभारण्याचा प्रकल्प गणपतीपुळेत राबविला जाईल. प्राथमिक सर्व्हे झाला. किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प उपयुक्‍त ठरू शकतो."

- कॅप्टन संजय उगलमुगल, प्रादेशिक बंदर अधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com