खादी कापडावर साकारली गांधीजींची कलाकृती

अजय सावंत
Monday, 5 October 2020

या कलाकृतीचे विशेष हे की कुडाळ तालुक्‍यातील माड्याचीवाडी रायवाडी येथील श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या जिव्हाळा सेवाश्रम या वृद्धाश्रमातील वृद्धांनी ही कलाकृती साकारली असून संकल्पना कला दिग्दर्शक डॉ. पाटील यांची आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे 150 चौरस फुटाच्या खादी कापडावर कोलाज कलाकृती साकारली. येथील श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या जिव्हाळा वृद्धाश्रमातील वृद्धांनी त्यासाठी पुढाकार घेतला. कला दिग्दर्शक डॉ. सुमीत पाटील यांची ही संकल्पना आहे. 

मध्य रेल्वेतर्फे मुंबई मंडळमध्ये दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात येते. विविध कलाविष्कारांद्वारे बापूंचा सामाजिक संदेश लाखो प्रवाशांना रेल्वे प्रशासनामार्फत या कलाकृतींतून दिला जातो.

या वर्षी कोरोनामुळे दरवर्षी इतकी प्रवाशांची गर्दी नसली तरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथे बापूंचे गोधडी स्वरुपातील 150 चौरस फुटांचे पोर्ट्रेट आणि गांधीजींचे विचार दर्शवणारे 80 चौरस फुटांचे भव्य पोर्ट्रेट प्रवाशांना पाहायला मिळणार आहे. या कलाकृतीचे विशेष हे की कुडाळ तालुक्‍यातील माड्याचीवाडी रायवाडी येथील श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या जिव्हाळा सेवाश्रम या वृद्धाश्रमातील वृद्धांनी ही कलाकृती साकारली असून संकल्पना कला दिग्दर्शक डॉ. पाटील यांची आहे. 

मंडळ सांस्कृतिक अकादमी, मुंबई मंडळ मध्य रेल्वे आणि श्रीरंग संस्थेच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होणाऱ्या या कलाकृतीला "प्रोटेक्‍ट इंडिया मुव्हमेंट' अंतर्गत गोदरेज लिमिटेडने त्यांच्या स्वच्छता विषयक आवश्‍यक प्रथानच्या प्रसारासाठी, वैयक्तिक आणि गृह स्वच्छता ब्रॅंड गोदरेज प्रोटेक्‍ट या सार्वजनिक मोहिमेद्वारे या संकल्पनेला प्रोत्साहन दिले. 

दरम्यान, ही कलाकृती साकारतानाचा एक व्हिडीओही बनवला आहे. त्याचे दिग्दर्शन पाटील आणि किशोर नाईक यांनी तर संकलन व व्हिडीओग्राफी आरती कादवडकर, संकेत जाधव, मकरंद नाईक, सौरभ नाईक आणि मिलिंद आडेलकर तर कृष्णा कोरगावकर, धीरज कादवडकर, साक्षी खाड्ये, संकेत कुडाळकर, संतोष धुरी, भरत शिंदे, योगेश राजे, प्रविण बर्वेकर, हौसलाप्रसाद तिवारी, निहार तांबे आणि रात्रीस खेळ चाले फेम मंगल राणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 

गांधीजींची विचारधारा 
या पोर्ट्रेटद्वारे गांधीजींची विचारधारा आणि त्यांच्या वापरातील वस्तू आणि त्यामागील संदेश, तत्त्व दिसणार आहेत. 150 चौरस फुटाच्या खादी कापडावर महात्मा गांधीजींची प्रतिमा आणि भारतीय रेल्वेचे चित्र गोधडी स्वरूपातील कोलाज हे यातील खास आकर्षण आहे. "सेवा हाच धर्म' या गांधीजींच्या विचारधारणेला धरून ही संकल्पना साकारली आहे. 

भेटीच्या आठवणी जाग्या 
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भेट दिली होती. त्यांच्या या ऐतिहासिक भेटीच्या आठवणी कलाकृतीतून जाग्या केल्या आहेत. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी समाजाला विसर पडलेली गांधींची मूल्ये सत्य, समता, बंधुता, स्वातंत्र्य, एकता आणि प्रेम यांची कॅलिग्राफी मास्कवर साकारली आहे. यात विविध रंगाच्या कपड्यांचा आणि धाग्यांचा वापर केला आहे.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artwork of Mahatma Gandhi on khadi cloth