शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपले, असे कोण म्हणाले ?

Arun Dudhawadkar Comment On Shivsena Opposites
Arun Dudhawadkar Comment On Shivsena Opposites

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कोकणात पर्यायाने सिंधुदुर्गात शिवसेना आज दिसते ती तळागाळातील ज्येष्ठ शिवसैनिकांमुळे; मात्र शिवसेनेने त्यांना मोठे केले ते आजही जिल्ह्यातील शिवसेना संपवण्याची भाषा करत आहे; परंतु शिवसेना कधीच संपणार नसून संपवणारे संपले आहेत. त्यांच्या पापाचे घडे भरल्याची टीका सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज येथे केली. 

येथील शिवसेना शाखेच्या 53 वर्षपूर्ती व शिवजयंतीनिमित्त ज्येष्ठ शिवसैनिक आणि समाजसेवकांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी ते व्यासपिठावरून बोलत होते.  जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, तालुका संपर्क प्रमुख राजू नाईक, माजी तालुका संपर्क प्रमुख दत्ता घाटकर, भरत पाटील आदी उपस्थित होते. 

श्री. दुधवडकर म्हणाले, "" निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेनाप्रमुखांच्या कक्षात सत्तेमध्ये 50 टक्के भागीदारीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शब्द दिला होता; मात्र हा शब्द निवडणुकीच्या निकालानंतर पाळळा गेला नाही. हा राग पक्षप्रमुखांना आल्याने त्यांनी युती तोडली. आज कोकणी माणसामुळे मुंबईत शिवसेना वाढली. कोकणी माणसावरील प्रेम आजही मुख्यमंत्री म्हणून ठाकरे विसरले नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिनी कॅबिनेट घेण्यामागचा त्यांचा हेतू या जिल्ह्याचा विकास साधणे हा होता. युती सरकारने शेतकऱ्यांना गेल्यावेळी दीड लाखापर्यंतची कर्जमाफी दिली होती; मात्र ठाकरे सरकारने दोन लाखापर्यंत कर्ज माफी दिली आहे. हा या सरकारमधील फरक असून येणाऱ्या काळात ज्या शिवसैनिकाने शिवसेना वाढीसाठी आयुष्य झिजविले त्या शिवसैनिकांना मानसन्मान मिळविण्यासाठी लवकरच विचार केला जाणार आहे.'' 

जिल्हाप्रमुख पडते म्हणाले, "" जिल्ह्यात आमदार, खासदार व पालकमंत्री ज्येष्ठ शिवसैनिकांमुळे आहेत. आमच्याकडून त्यावेळी काही गोष्टी चुकल्या असतील; पण त्यावेळी तशा अडचणही होत्या, आजही आम्ही शिवसैनिकच म्हणून पूर्वीसारखेच कठोर आहोत. शिवसेनेला चांगले दिवस आले आहेत. शिवसेना सत्तेत असून तळागाळातील शिवसैनिकांनी व कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन शिवसेना मोठ्या जोमाने उभी करावी.'' 

सतीश सावंत म्हणाले, "" काही लोक देव पाण्यात ठेवून सरकार कोसळण्याची वाट पाहत होते; मात्र आज सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसात मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यास सुरू केली आहे. कर्जमुक्तीची घोषणा आज पूर्ण होत असतानाच जिल्ह्यात चौदा हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. येणाऱ्या काळात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. खावटी कर्ज ही माफ करण्याबाबत शासन प्रयत्नशील असून येत्या दीड-दोन महिन्यात याबाबत आशेचा किरण नक्कीच दिसेल. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी पेटून उठून कामाला लागावे.'' 

शहरात 53 वर्षापूर्वी ज्यांनी शाखा स्थापन करून जिल्ह्यात शिवसेना उभी केली अशा वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यांचा शाल, श्रीफळ व तलवार भेट देऊन श्री. दुधवडकर यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. याच बरोबर दीडशे ज्येष्ठ शिवसैनिक व पन्नास समाजसेवकांचाही शिवसेनेकडून सत्कार करण्यात आला. 

प्रास्ताविकात तालुकाप्रमुख राऊळ यांनी केले. यावेळी प्रशांत कोठावळे, सागर नाणोसकर, शिवसेना तालुका संघटक अपर्णा कोठावळे, रश्‍मी माळवदे, नगरसेवक भारती मोरे, अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर, दिपाली सावंत, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, अमेय तेंडोलकर, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आदी उपस्थित होते. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com