शिवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेचे गणित सोपे 

राजेश कळबंटे 
सोमवार, 24 जून 2019

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून इच्छुक उमेदवार तयारीलाही लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी तीन जागा शिवसेनेकडे तर दोन राष्ट्रवादीकडे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कमी-जास्त प्रमाणात अंतर्गत सुंदोपसुंदी सुरु आहे.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून इच्छुक उमेदवार तयारीलाही लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी तीन जागा शिवसेनेकडे तर दोन राष्ट्रवादीकडे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर कमी-जास्त प्रमाणात अंतर्गत सुंदोपसुंदी सुरु आहे. पाचही ठिकाणी भाजपची जोड शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडू शकते.

रत्नागिरी वगळता अन्य चारही मतदारसंघात शिवसेनेसह राष्ट्रवादीत कमी-अधिक प्रमाणात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. चिपळुणात भास्कररावांनी तयार केलेली हवा चर्चेचा मुद्‌दा बनली आहे. तर राजापूरात स्थानिक उमेदवाराचे पिल्लू सोडले आहे. खेड-दापोलीत सूर्यकांत दळवींच्या कुरघोड्या शिवसेनेला मारक ठरू शकतात. यामधून रत्नागिरी, गुहागर अद्यापही बाजूला आहेत. 

युती, आघाडीचे जागा वाटप 
विधानसभा निवडणुकीत युती विरुध्द आघाडी अशी लढत राहील,असे सध्याचे चित्र आहे. मुख्यमंत्रीपदावरुन युतीत चुरस असली तरीही शेवटच्या क्षणी त्यात काहीतरी तोडगा निघेल अशी चिन्हे आहेत. पाच विधानसभा मतदारसंघात गुहागर, खेड-दापोली राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तर चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर शिवसेनेकडे आहेत. युती झाली तर गुहागर मतदारसंघ भाजपला जाणार हे निश्‍चित आहे. रत्नागिरी भाजपचा जुना मतदारसंघ असला तरीही सध्या तिथे आमदार शिवसेनेचे आहेत. हातचा मतदारसंघ शिवसेना सोडणार नाही. आघाडीच्या जागा वाटपात गुहागर, खेड-दापोलीसह चिपळूण राष्ट्रवादीकडे राहील. रत्नागिरीत कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक आहे.राजापूरमध्ये कॉंग्रेसचा बऱ्यापैकी दबदबा आहे. त्यामुळे ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला राहील. 

तर स्वाभिमानला महत्व येणार 
जिल्ह्यातील पाचही मतदारसंघापैकी रत्नागिरी वगळता प्रत्येक मतदारसंघात स्थानिक पातळीवरील काही गोष्टी अंडर करंटसारख्या आहेत. याचा पडताळा वेगवेगळ्या वेळी येत आहे. दापोली - खेड - मंडणगडमध्ये सूर्यकांत दळवींच्या खेळीसोबत मंडणगडातून कॉंग्रेसकडून जागेची मागणी झाली आहे. येथे उमेदवारही तयार आहे. गुहागरातून भास्कर जाधव चिपळूण मागत आहेत. ते तिकडे गेल्यास गुहागरची उमेदवारी कोणाला आणि कुणबी समाज यावेळी कोणाच्या पाठीशी उभा राहणार हा, प्रश्‍न आहे. चिपळूण आणि राजापूर मतदारसंघाबाबत कॉंग्रेस राष्ट्रवादीत विनाकारण चढाओढ आहे. आपली ताकद न ओळखता दोन्ही पक्ष दावा करत आहेत. वंचित आघाडीने लक्षणीय मते मिळविली होती. त्यांची भूमिका काय राहणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या सर्वांपेक्षाही महत्त्वाचे म्हणजे स्वाभिमानने दक्षिण रत्नागिरीत मिळवलेली मते कोणाकडे वळणार,यावर समीकरणे बदलू शकतात. युती झाली नाही तर स्वाभिमानला फार मोठे महत्त्व येऊ शकते. 

रत्नागिरी शिवसेनेसाठी सुरक्षित 

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर आमदार उदय सामंत यांनी एकहाती वर्चस्व राखण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभे करणे हे विरोधी पक्षांपुढे आव्हानच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुदेश मयेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. स्वतःची मते आणि तळागाळात पोचलेली शिवसेनेची ताकद ही आमदार सामंत यांची जमेची बाजू आहे. मागील निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवल्यानंतरही सामंत मोठ्या फरकाने निवडून आले. युतीमुळे त्यांच्या ताकदीत भर पडणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत नाराजी सामंतांच्या वर्चस्वाला धक्का लाऊ शकत नाही. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुरक्षित मानला जात आहे. 

राजापूर सेप, पण सेनेतर्गंत कुरबुरी 

राजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राजन साळवींचा तळागाळातील संपर्क आजपर्यंत त्यांना तारत आला आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन साळवी यांनी राजकारणात वेगळा पायंडा पाडला होता. राजापूर - लांजा - साखरपा अशा विस्तारलेल्या मतदारसंघाला वेळ देण्याचा ते प्रयत्न करतात. गतवेळप्रमाणेच यावेळीही त्यांना अंतर्गत कुरबुरीला सामोरे जावे लागत आहे. गतवेळी राष्ट्रवादीकडून लढलेल्या अजित यशवंतराव यांच्या रुपाने पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरु होता; मात्र थेट पक्षप्रमुखांकडूनच त्याला हिरवा कंदिल न मिळाल्याने तो फसला. अजुनही यशवंतराव शिवसेनेत येण्याच्या आशेवर असल्याची चर्चा आहे. स्थानिक उमेदवार अशी आवई उठवून पुन्हा गोंधळ उडविण्याचा प्रयत्न शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांकडून सुरु आहे; परंतु लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍य देण्यात आमदार साळवी यशस्वी झाले. साळवींचा मार्ग त्यामुळे सुकर आहे. या ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेदवार निश्‍चित झालेला नाही. हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे राहणार आहे. अविनाश लाड यांच्याबरोबर अनेक नावे चर्चेत आहेत. 

चिपळुणात निकमांपुढे आव्हान स्वकीयांचेही 
पाणीटंचाईचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शेखर निकमांनी पुढाकार घेऊन मतदारांपुढे जलदूत बनण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारातील निकमांची भूमिका त्यांच्यासाठी भविष्यात अडचणीची ठरेल, असे चित्र रंगवले जात आहे. त्यातूनही निकम घौडदौड करित आहेत. आमदार भास्कर जाधव यांनी मुलासोबत मी विधानसभेत दिसेन असे वक्‍तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. चिपळूण जाधव यांचा जुना मतदारसंघ. त्यांची येथून निवडणूक लढविण्याची इच्छा आहेच. मागील विधानसभा निवडणुकीत निकमांनी शिवसेनेचा धूर काढला होता. पण भास्कर जाधवांच्या मदतीशिवाय विजय मिळवण्याचे स्वप्न तितकेसे यशस्वी होईल असे नाही. लोकसभेला 58 हजाराचे मताधिक्‍य मिळवून दिल्याने आमदार सदानंद चव्हाणांचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. 

दापोलीत सेनेत कुरबुरी; विद्यमानांचे आव्हान 

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघाच्या आखाड्‌यात उतरत असल्याने सर्वांचेच लक्ष तिकडे आहे. त्यांना माजी आमदार सूर्यकांत दळवींचे आव्हान राहणार हे निश्‍चित आहे. लोकसभा निवडणुकीत दळवींनी आपली उपयुक्‍तता सिध्द केली आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांना खेड शहरात मनसेचे पाठबळ आहे. मंडणगडमध्येही कदमांनी वर्चस्व राखले आहे. मच्छीमारांच्या मागे उभे राहून कदमांनी त्यांचा प्रश्‍न विधानसभेत लावून धरला होता. मतदारसंघातील प्रत्येक प्रश्‍नावर आवाज उठवून जनमानसात सकारात्मक प्रतिमा उमटवली आहे. पर्यावरणमंत्री असल्यामुळे रामदास भाईंनी निधी सिंचन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही जमेची बाजू असली तरीही याठिकाणी भाजपची मदत भाईंसाठी उपयुक्‍त ठरु शकते. त्यासाठी स्थानिक भाजप नेतृत्त्वाला चुचकारावे लागणार आहे. 

गुहागरात राष्ट्रवादी एकहाती; भाजपकडून नातूच? 

गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व राखले आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळालेले नसले तरीही ग्रामीण भागात राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे. युती झाल्यास हा मतदारसंघ भाजपकडे राहील; परंतु माजी आमदार विनय नातू यांच्या व्यतिरिक्‍त अन्य उमेदवार नाही. भास्कर जाधव यांच्यापुढे तगडा उमेदवार उभे करण्याचे आव्हान आहे. नातू यांच्यानंतर दुसरा कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह कुणबी समाजाचे सहदेव बेटकर यांनीही या मतदारसंघावर दावा केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assembly election easy to Shivsena in Ratnagiri district