एक्‍साईजच्या अधिकाऱ्यावर इन्सुलीत जीवघेणा हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

याबाबतची फिर्याद शैलेन्द्र चव्हाण यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. यात उत्पादन शुल्कचे चालक रमेश चंदुरे यांना ठार मारण्याची धमकी संशयितांनी दिल्याचेही म्हटले आहे. मारहाणीचे थरारनाट्य काल (ता.22) मध्यरात्री दीडच्या सुमारास उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाक्‍यावर घडले. 

बांदा ( सिंधुदुर्ग ) - गोवा बनावटीची दारु वाहतुक करणारी व्हॅन पकडून कारवाई केल्याचा राग मनात धरुन माजगाव (ता. सावंतवाडी) मधील तिघांनी इन्सुली उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षकांवर जीवघेणा हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार काल (ता.22) मध्यरात्री घडला.

संशयित नितीन प्रकाश सूर्यवंशी (वय 42, रा माजगाव-तांबळगोठण) याने केलेल्या चाकु हल्ल्यात दुय्यम निरीक्षक शैलेन्द्र हरिश्‍चंद्र चव्हाण (51, रा. कल्याण, सध्या रा. सावंतवाडी ) यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी नितीन सूर्यवंशीसह रामजी विनायक देसाई (रा. माजगाव-कुंभारवाडा) ला अटक केली आहे. तिसरा संशयित बाळा राठवड (रा. माजगाव-कासारवाडा) पसार असल्याचे येथील पोलिसांनी सांगितले. 

याबाबतची फिर्याद शैलेन्द्र चव्हाण यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. यात उत्पादन शुल्कचे चालक रमेश चंदुरे यांना ठार मारण्याची धमकी संशयितांनी दिल्याचेही म्हटले आहे. मारहाणीचे थरारनाट्य काल (ता.22) मध्यरात्री दीडच्या सुमारास उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाक्‍यावर घडले. 

याबाबत येथील पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी ः इन्सुली तपासणी नाक्‍याचे उत्पादन शुल्क खात्याचे दुय्यम निरीक्षक शैलेन्द्र चव्हाण सहकाऱ्यांसह मध्यरात्री इन्सुली कार्यालयात होते. त्यावेळी संशयित नितीन सूर्यवंशी, रामजी देसाई व बाळा राठवड कार्यालयात घुसले. कारवाई केलेली व्हॅन कार्यालयाच्या मागे न लावल्याचे कारण पुढे करुन चव्हाण यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. कारवाई केल्याचा राग मनात धरुन शिवीगाळ व धमकी दिली. उत्पादन शुल्कचे चालक रमेश चंदूरे यांना ठार मारण्याची धमकी दिली. संशयित सूर्यवंशीने चाकूने निरीक्षक चव्हाण यांच्या डाव्या हातावर हल्ला केला. त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. 

त्यानंतर येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. संशयित सूर्यवंशी व देसाईला अटक करण्यात आली. तिसरा संशयित राठवड नजरेआड झाला. सूर्यवंशी व देसाईला आज दुपारी सावंतवाडी येथील न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने दोघांना चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack On Excise Officer In Insuli Sindhudurg Marathi News