कोकणात आंब्यावर लाल कोळीचा प्रादुर्भाव 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

गेले पंधरा दिवस सतत उन्हाचा कडाका आणि ढगाळ वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. सलग चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे जानेवारीच्या सुरवातीला तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला होता

रत्नागिरी - ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा पिकावर होत असून तुडतुड्या पाठोपाठ लाल कोळीचाही प्रादुर्भाव काही बागांमध्ये झालेला आहे. हा कोळी पानातील रस शोषून घेत असल्यामुळे पाने गळून जातात. त्याचा मोहोरावरही परिणाम होत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारण्यांचा हात मारावा लागत आहे. 

गेले पंधरा दिवस सतत उन्हाचा कडाका आणि ढगाळ वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. सलग चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे जानेवारीच्या सुरवातीला तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला होता; मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. थंडीच्या अभावामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया खंडित झालेली आहे.

विचित्र हवामानाच्या परिणामामुळे काही बागांमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा कोळी आंब्याच्या पानांमधील रस शोषून घेतो. पाने करपून जातात आणि ती गळून पडतात. ही कीड मोहोरालाही घातक बनलेली आहे. बागेमध्ये काही झाडांवर लाल कोळी दिसून आला.

एका झाडापासून तो तीन मीटर अंतरावर उडू शकतो. त्यामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडापासून जवळ असलेल्या 25 झाडांवर औषधांची फवारणी करावी लागते. पावसमधील तीन बागांमधील काही झाडांवर हा कीटक सापडला. तेथे फवारणी केली आहे. एका फवारणीसाठी 2 हजार रुपयांचे निविष्ठा लागते. तापमानातील बदलांमुळेच हा रोग उद्‌भवला आहे. 

लाल कोळीचा प्रादुर्भाव हा ढगाळ वातावरणाचा परिणाम आहे. एका झाडावर आढळला की त्यापासूनच्या 25 झाडांवर फवारणी करावी लागते. त्यामुळे फवारणीचा खर्च वाढतो. 
- आनंद देसाई, बागायतदार 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack of red spider on mango in Konkan

Tags
टॉपिकस
Topic Tags: