
सिंधुदूर्ग : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोखण्याचा सिंधुदुर्गात प्रयत्न
सावंतवाडी - सांगली येथील नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोखण्याचा शिवसेनेसह इतर पक्षांनी प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने त्यांना यश आले नाही. ठिकठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर कारवाई केली. वेंगुर्ले, सावंतवाडी, वैभववाडी, मालवण येथे राजकीय कार्यकर्त्यांनी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशाचा जोरदार निषेध केला. मालवणमध्ये सर्वपक्षीयांनी एकत्र येत परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. काही प्रमाणात वेंगुर्लेतही या आंदोलनाला यश आले. नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी जिल्ह्यात विविध केंद्रांवर परीक्षा झाली. यात परजिल्ह्यातील विद्यार्थी बोगस कागदपत्रे दाखवून परीक्षेला बसणार असल्याचा आरोप शिवसेनेसह इतर पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. प्रशासनाकडे याला रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती; मात्र विद्यार्थ्यांना आधीच प्रवेशपत्र वाटण्यात आली होती. शिवाय जिल्ह्यातीलच काही शाळांनी विद्यार्थ्यांना यासाठी कागदपत्र तसेच तहसीलदारांकडून रहिवासी दाखला देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज विविध केंद्रांवर निवड परीक्षा झाली.
येथील आरपीडी महाविद्यालयाच्या केंद्रावर आलेल्या परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोखले. त्यामुळे परजिल्ह्यातील पालक व विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर उभे होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या रेटून धरत आधार कार्ड व हॉल तिकीट यावरील पत्ते वेगवेगळे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे वादावादी होऊन काहीकाळ वातावरण तंग झाले. पोलिसांनी यात वेळीच हस्तक्षेप केला. काही झाले तरी कायदा हातात घेऊ देणार नाही, मुलांचे भवितव्य खराब होऊ देणार नाही, असे सांगत पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी सांगत कठोर भूमिका घेत परराज्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला. यानंतर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वैभववाडीतही शिवसेनेने आंदोलन केले. नवोदय प्रवेश परीक्षेपासून परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते कोकिसरे येथील परीक्षा केंद्राबाहेर जमले होते; मात्र कडक पोलिस बंदोबस्तात सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. दरम्यान, बोगस नोंदणी करणारे मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.
जिल्ह्याबाहेर अॅकॅडमीत शिक्षण घेत असलेल्या ३० हून अधिक विद्यार्थ्यांची पटनोंदणी तालुक्यातील काही शाळांमध्ये केली आहे. नवोदय परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून ही नोंदणी करण्यात आली असून, हा प्रकार उजेडात आल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि पालकांनी बोगस नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देऊ नये, अशी मागणी करीत लावून धरली होती. मुख्याध्यापक आणि संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली होती. मालवणात सर्वपक्षीय पदाधिकारी या प्रश्नासाठी एकत्र आले. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी परजिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना आज येथील परीक्षा केंद्राच्या बाहेरच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रोखले. यात शहरातील काही भागांमध्ये परजिल्ह्यातून आलेल्या काही पालकांना स्थानिकांनी चोप देत माघारी घालविले. स्थानिक विद्यार्थ्यांव्यतिरिक्त एकाही परजिल्ह्यातील विद्यार्थ्याला परीक्षेस बसू दिले नाही. यावेळी परीक्षा केंद्रावर प्रभारी पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वेंगुर्ले येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रम भूमिका घेतली. येथील पाटकर हायस्कूलच्या नवोदय परीक्षा केंद्रावर सकाळी नऊ वाजता परीक्षा देण्यासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रोखले. परीक्षा केंद्राकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओळखीची माहिती देऊन जे विद्यार्थी परजिल्ह्यातील आहेत, त्या विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारावरूनच माघारी पाठविले. दरम्यान, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, उपनिरीक्षक केसरकर पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हॉल तिकिटाची तपासणी करून परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडले. पोलिसांच्या या भूमिकेवर भाजपने जोरदार आक्षेप घेतला. यावेळी खडाजंगीही झाली. हा तणाव उशिरापर्यंत सुरू होता.