एसटी कंडक्टरच्या मृत्यूचे गूढ कायम ; मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत पाहून सर्वच चक्रावले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेजाऱ्यांनी पाहिला. त्यानंतर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

रत्नागिरी : माळनाका एसटी कॉलनीच्या मागील बाजूला असलेल्या चाळीत एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळच्या सुमारास ही घटना 
उघड झाली.

रत्नागिरी एसटी विभागात वाहक-चालक म्हणून कार्यरत असलेले पांडुरंग संभाजीराव गडदे (वय ३७, मूळ रा. बीड) हे एसटी कॉलनीच्या मागील बाजूला असलेल्या चाळीत भाड्याने राहात होते. रविवारी सकाळपासून ते घराबाहेर पडले नव्हते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेजाऱ्यांनी पाहिला. त्यानंतर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

हेही वाचा - राष्ट्रवादी मजबूतीसाठी कामाला लागा ः पाटील -

पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यानंतर पांडुरंग गडदे यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला, मात्र मृतदेहाच्या अंगावर कपडे नसल्यामुळे पांडुरंग गडदे यांच्या सहकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला आहे. शवविच्छेदन केल्यानंतरच पांडुरंग यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे स्पष्ट होणार आहे. पांडुरंग गडदे कपडे काढून का आत्महत्या करतील, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शहर पोलिसांनी सर्वप्रकारे तपास सुरू केला आहे. जिल्हा रुग्णालयाने शवविच्छेदन अहवाल दिल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे. आम्ही शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत, असे पोलिस निरीक्षक अनिल लाड यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attend suicide of a SET employee in ratnagiri but it's suspended