रत्नागिरीतील पहिला दाता ; रिक्षाचालक, कोविड योद्‌ध्याने केले प्लाझ्मा दान 

नरेश पांचाळ 
Monday, 19 October 2020

रिक्षा व्यवसायातून मिळालेल्या कमाईतील काही एक भाग समाजासाठी जावा, असे त्यांचे प्रयत्न असतात

रत्नागिरी - समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सामाजिक काम करणारे शिरगाव गणेशवाडी येथील सुबहान अजीज तांबोळी यांनी कोविड-19 च्या महामारीत "कोविड योद्धा' म्हणून काम केले. या महामारीत त्यांनी प्लाझ्मा दान केले असून ग्रामीण भागातून प्लाझ्मा दान करणारे ते पहिले ठरले आहेत. ते रिक्षाचालक आहेत. 

रिक्षा व्यवसायातून मिळालेल्या कमाईतील काही एक भाग समाजासाठी जावा, असे त्यांचे प्रयत्न असतात. या आधी शिरगाव येथे वाहतूक कोंडीत सापडलेल्या दहावी-बारावीच्या मुलांना कॉलेजपर्यंत मोफत सोडण्याचे काम करून त्यांनी बांधिलकी जपली होती. सामाजिक कार्य करताना कोविड-19 महामारीला सुरवात झाल्यानंतर त्यांनी रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत नेण्याचे काम केले. तसेच चारचाकीने जिल्ह्यात गरजूंना औषधे पोचविण्याचे काम ते करत होते. त्यांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते. रत्नागिरीत प्लाझ्मा थेरपीचे युनिट तयार केले. या युनिटमध्ये सर्वप्रथम त्यांनी रविवारी (ता. 18) स्वतः प्लाझ्मा दान केले. त्यामुळे ग्रामीण भागात रिक्षा व्यवसाय करणारे व प्लाझ्मा दान करणारे ते पहिले रिक्षाचालक ठरले आहेत. प्लाझ्मा दान करण्याचा कार्यक्रम उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मानारायण मिश्रा यांच्या उपस्थितीत झाला. 

कोविड महामारीत स्वतःला झालेली लागण, त्यातून बरे झाल्यावर तपासणीत योग्य ठरलो तर दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला होता. संधी मिळताच प्लाझा दान केले. 
-सुबहान तांबोळी

हे पण वाचा - मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी लाच घेताना दोन अधिकारी जाळ्यात

संसर्गात प्रत्येकाला संघर्ष करताना पाहिले.. 

कोविड संसर्गात ते काम करत असताना त्यांनी कोविडची चाचणी केली. त्या चाचणीमध्ये त्यांच्या कुटुंबातील ते स्वतः व त्यांचे चिरंजीव हे दोघे पॉझिटिव्ह आले. त्या दोघांनीही कोरोनावर मात केली. या कालावधीत त्यांनी कोविड-19 संसर्गात प्रत्येकजण संघर्ष करताना जवळून पाहिले होते. ते स्वतः व चिरंजीव बरा झाल्यानंतरही त्यांनी आपले सेवाकार्य सुरूच ठेवले होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: autorickshaw driver donated plasma in ratnagiri