
येथे पाऊस मोजण्याचे काम पर्जन्यमापक भाऊ ओगले यांच्या तीन पिढ्या करत आहेत. त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर येथेही पावसाचे वेळापत्रक मागेपुढे होत असल्याचे लक्षात आले.
आंबोली (सिंधुदुर्ग) - आंबोलीचा पाऊस वेगळीच शान घेवून दरवर्षी बरसतो; पण वातावरणातील बदलाचा प्रभाव इथल्या पावसावरही दिसू लागला आहे. गेल्यावर्षी तर विक्रमी पाऊस झाला. यंदाही आतापर्यंत पावसाने सरासरी पार केली आहे. 300च्या सरासरासरीने ऑक्टोबर पर्यंत बरसणारा पाऊस आताच 380 इंचावर पोहोचला आहे.
येथे पाऊस मोजण्याचे काम पर्जन्यमापक भाऊ ओगले यांच्या तीन पिढ्या करत आहेत. त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर येथेही पावसाचे वेळापत्रक मागेपुढे होत असल्याचे लक्षात आले. पूर्वी येथे कोसळणाऱ्या पावसात बऱ्यापैकी एकसुरीपणा असायचा. आता मात्र पाऊस कमी जास्त होत असला तरी त्याच्या बरसण्याच्या पद्धतीत साधर्म्य नाही. एखाद्यावर्षी ठरावीक वेळेलाच मुसळधार तर काहीवेळा हंगामभर सलग पाऊस पडतो.
आंबोलीत यावर्षी आतापर्यंत 380 इंच पाऊस झाला. सरासरीच्या 80 इंचाने आतापर्यंतचा पाऊस जास्त आहे. 1 जुनपासून वादळामुळे जवळपास 50 इंच पाऊस झाला त्यानंतर 15 दिवस पाऊस नव्हता. शेवटी त्याने पुन्हा जोर धरला. तो दीर्घकाळ पाऊस बरसला. जुलैमध्ये पावसाने सरासरी भरून काढली. जून महिन्यातील पावसाची स्थिती पाहता यावर्षी एवढा पाऊस होणार नसल्याचे वाटत होते; मात्र साधारण 300च्या आसपास सरासरी असलेला इथला पाऊस यंदा कमी कालावधीत जास्त बरसला आहे, अशी माहिती पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी दिली.
गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता; मात्र नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाची मोजदाज यात नाही. त्यामुळे प्रत्यक्षात यापेक्षा जास्त पाऊस झाला. जगात सर्वाधिक पाऊस हिमालयातील मौसिंराम येथे होतो. त्यानंतर चेरापुंजीचा नंबर लागतो; मात्र त्याहीपेक्षा जास्त सह्याद्री पर्वतातील उंच डोंगररांगात असणाऱ्या आंबोलीत गेल्यावर्षी पाऊस झाला होता.
पदरी नुकसानच
राज्यात आंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो. येथे 1 जून ते 30 ऑक्टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो. यावर्षी आता पाऊस जायला हवा असे लोकांना वाटते आहे. आधीच कोरोना त्यात शेतीची नुकसानी नको आहे. यावर्षी लोकांनी रोजगार नाही म्हणून मोठ्या अपेक्षेने शेती केली आहे. भात शेती, नाचणी, ऊस शेतीचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना चिंता
यावर्षी पावसाळ्यात 25 वर्षानंतर प्रथमच पर्यटन बंद असल्याचे पहावयास मिळाले.त्यामुळे पावसाळ्यात आंबोलीत वातावरण पर्यटकांमुळे शांत असले तरी कोरोना आणि पावसाने त्यात भर घातली.दरवर्षी पितृपक्षानंतर (महालया) पाऊस कमी होतो आणि दसऱ्याला तो जातो किंवा अगदीच क्वचित लागतो त्यानंतर; मात्र यावर्षी अजूनही दमदार पाऊस होत असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
संपादन - राहुल पाटील