"कोरोनाची लढाय घरात बसानच लढाया' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मे 2020

सध्या कोरोना या महाभयंकर रोगाने आज जग त्रस्त आहे. भारतातही याचा प्रसार झपाट्याने होत आहे. यासाठी वैद्यकीय यंत्रणा आपले कौशल्य पणाला लावत आहे.

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - कणकवली तालुक्‍यातील हेल्पिंग हॅण्ड आणि स्नेहांश एंटरटेनमेंट' या क्रिएटिव्ह ग्रुपच्या माध्यमातून "कोरोनाची ही लढाय घरात बसानच लढाया' असा संदेश लढायमधून देत लोकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. 

सध्या कोरोना या महाभयंकर रोगाने आज जग त्रस्त आहे. भारतातही याचा प्रसार झपाट्याने होत आहे. यासाठी वैद्यकीय यंत्रणा आपले कौशल्य पणाला लावत आहे. एवढेच नाही तर पोलिस, डॉक्‍टर, स्वछतादूत पत्रकार आणि प्रशासन यांच्या माध्यमातून देशाला या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या सगळ्यामध्ये समाज प्रबोधनाकरिता एक खारीचा वाटा म्हणून सोशल मीडियाच्या आधारे लोकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने कणकवली तालुक्‍यातील 'स्नेहांश एंटरटेनमेंट'या क्रिएटिव्ह ग्रुपच्या माध्यमातून योगदान देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

गावाच्या ओढीने तीन तरुण मुंबईतून टेम्पोतून लपून गावात येतात पोलिसांना चकवा देत घराच्या दिशेने पावले टाकतात; मात्र सरपंचाच्या सांगण्यावरून ते आपल्या आरोग्याची तपासणी करून क्‍वारंटाईन होऊन घरातच बसून कोरोनाशी लढत देत ही लढाई आम्ही जिंकणारच असल्याचा निर्थार करतात. मुंबईत एवढा मोठा संकट असतानासुद्धा सर्वजण कोरोनाला एकजुटीने हरविण्यासठी सज्ज झाले तर वडील सांगतात कोरोनासाठी केंद्र, राज्य शासन, प्रशासन आरोग्य व पोलीस यंत्रणा खूप चांगले काम करीत असल्याचे या शॉर्ट फिल्ममधून साकारण्यात आले आहे. मूळ कथा - कवतीक-(प्रकाश सरवणकर), कथा स्पांतरण/संकल्पना/संवादलेखन-शेखर गवस, लेखन सहाय्य - प्रा. सिद्धेश खटावकर, छायांकन संकलन - आर. शिरवलकर, दिग्दर्शक-स्वप्निल राणे, निर्माता - मयूर चव्हाण आहेत. 

कणकवलीतील हरहुन्नरी कलाकारांनी घरबसल्या आपल्या अभिनयाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृतीचा एक वेगळाच साज चढवला आहे. यामध्ये अक्षता कांबळी, ऍड. संजय राणे, प्रा. शेखर गवस, आनंद जाधव, मयुर चव्हाण, प्रा. सिद्धेश खटावकर, सत्यवान गावकर, प्रमोद तांबे यांनी अभिनय कौशल्यातून परिणामकारकरित्या संदेश पोहचवला आहे. हा व्हिडीओ हा "वर्क फ्रॉम होम' या नावाखाली केलेला आहे. हेमंत कदम, रामचंद्र कुबल, साहिल राणे आणि अक्षरसिंधु साहित्य कलामंच, कणकवली याचे सहकार्य लाभले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness On Corona By Helping Hands And Snhaush Entertainment