सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुंबईतही जनजागृती 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीतर्फे विविध स्तरावर जनजागरण करण्यात येत आहे. यात मुंबईत स्थायिक असणारे परंतु मूळचे सिंधुदुर्गवासिय असणाऱ्या नागरिकांमध्ये देखील याबाबत जनजागरण करण्यात आले.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरू व्हावे, यासाठी कृती समितीने सुरू केलेली जनजागृती मुंबईपर्यंत पोहोचली आहे. समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकर चाकरमानीही मुंबईत विविध पक्षांच्या नेत्यांना भेटून ही मागणी लावून धरत आहेत. 

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीतर्फे विविध स्तरावर जनजागरण करण्यात येत आहे. यात मुंबईत स्थायिक असणारे परंतु मूळचे सिंधुदुर्गवासिय असणाऱ्या नागरिकांमध्ये देखील याबाबत जनजागरण करण्यात आले.

चाकरमानी जरी मुंबईत वास्तव्यास असले तरी त्यांचे सगेसोयरे गावाकडेच असतात. त्यांना व अपरोक्षपणे चाकरमानी बांधवांना आरोग्यविषयक समस्येला सामोरे जावे लागते. म्हणूनच कृती समितीच्या या पाठपुराव्याला मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी पाठिंबा मिळत आहे. तेथील सिंधुदुर्गवासिय असणाऱ्या नगरसेवक, आमदार, विविध पक्षांच्या नेते मंडळींना वारंवार निवेदने सादर करण्यात आली. 

सिंधुदुर्गशी संबंधित मंत्र्यांच्या जनता दरबारात देखील वारंवार निवेदने देऊन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पाठपुरावा करण्यात आला. मुंबईकर कलाकारांनी जनजागृतीसाठी चित्रफीत तयार करून ती समाज माध्यमातून पसरविण्यात आली. सिंधुदुर्गवासिय असणारे कर्मचारी देखील याचा त्यांच्या स्तरावर जोरदार पाठपुरावा करीत आहेत. 
याचाच भाग म्हणून मंगळवारी (ता. 20) खासदार विनायक राऊत यांची शिवालय - शिवसेना जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन तिथल्या चाकरमान्यांनी निवेदन सादर केले.

सिंधुदुर्गच्या नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल सविस्तर चर्चा केली. पुढचा टप्पा लवकर मार्गी लावण्याची विनंती केली. राऊत यांनी याविषयी सर्व आवश्‍यक बाबी लवकरात लवकर पूर्ण करून वैद्यकीय शिक्षण विभागाचा शासन निर्णय घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये चालू करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदतीने लवकरात लवकर उपलब्ध करून प्रकल्पाच्या कामास सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. रवींद्र वेंगुर्लेकर, राजू कांबळे, रोहन पुळसकर - सावंत, संतोष वारंग, तुषार राणे आदींनी हा पाठपुरावा केला. 

पालकमंत्र्यांकडूनही ग्वाही 
दरम्यान जनता दरबारात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन सादर करण्यात आले. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीतील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची त्यांची स्वतःची जबाबदारी आहे, अशी ग्वाही त्यांनी कृती समितीच्या प्रतिनिधींना दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षी सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी पुन्हा दिली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness In Mumbai For Medical College In Sindhudurg