मंडणगड तालुक्यात गावोगावी मनोऱ्यातून कोरोनामुक्तीचा संदेश 

सचिन माळी
Wednesday, 7 October 2020

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा व्यवस्थापन कक्ष, रत्नागिरीच्या वतीने कोरोनाविरोधी मनोरा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मंडणगड ( रत्नागिरी ) - "कुटुंबाची साथ, कोरोनावर मात' या घोषवाक्‍यास अनुसरून कोविड-19 ची प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना जनजागृती व्हावी, या उद्देशाने कोरोनाविरोधी मनोरे उभे करून मुक्तीचा संदेश दिला. तालुक्‍यात गावोगावी उमेदच्या 52 ग्रामसंघ व त्यांच्या बचतगटांद्वारे हा उपक्रम राबविताना महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा व्यवस्थापन कक्ष, रत्नागिरीच्या वतीने कोरोनाविरोधी मनोरा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम सध्या सुरू असून, त्याचा प्रचार आणि प्रसिद्धी होण्याच्या दृष्टीने व जनतेचे सहकार्य मिळावे, या हेतूने सुरू केलेला हा उपक्रम फायदेशीर ठरत आहे.

तालुक्‍यातील नारगोली, माहू, तुळशी, वेळास, पाले, शेडवई, बाणकोट, निगडी, वेसवी या गावांत मनोरे उभे केले आहेत. अन्य गावांतून ते उभेकरण्याची तयारी सुरू आहे. 5 ते 10 फूट उंचीच्या या मनोऱ्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबतचे संदेश व जनजागृतीबाबत घोषवाक्‍ये लक्षवेधी ठरली आहेत.

मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्स यावर भाष्य करणारे मनोरे आरोग्याविषयी गांभीर्य बिंबवणारे ठरले. बचतगटांतील महिला यात सक्रिय झाल्याने कोरोनाविषयीची जनजागृती घरोघरी पोहोचू लागली आहे. मनोऱ्याच्या ठिकाणी गाण्यातून, भाषणातून व कलात्मक सादरीकरणातून गाववासीयांना सुरक्षित काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आपले गाव कोरोनामुक्त राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी एम. दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अभियान व्यवस्थापक मोहन पोवार, तालुका व्यवस्थापक रूपेश मर्चंडे, प्रभाग समन्वयिका समिधा सापटे यांनी ग्रामसंघ व बचतगटांच्या सोबतीने हा उपक्रम यशस्वी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awarness About Corona Through Pyramid In Mandangad Taluka