भावाचे लग्न विसरून नववीतील भिवा वाचनात रमला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भावाचे लग्न विसरून नववीतील भिवा वाचनात रमला

भावाचे लग्न विसरून नववीतील भिवा वाचनात रमला

आंबडवेचे भाग्य - गावाबाहेरील देवळामध्येच पुस्तकासह ठिय्या

मंडणगड - बाबासाहेब विद्यार्थिदशेतच ज्ञानासाठी कसे भुकेले होते, याची अत्यंत मार्मिक आठवण आहे. नववीतील भिवा (बाबासाहेब) भावाच्या लग्नसोहळ्यासाठी मुंबईतून गावी आले, परंतु सोहळा विसरून गावाबाहेरच्या देवळात ते वाचनातच तल्लीन झाले. पुस्तकात भिवा एवढा गुंगून गेला, की त्याला भावाच्या लग्नाचा विसर पडला. ज्ञानासाठी विद्यार्थी या पद्धतीने तल्लीन होण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असावे. ही आठवण सांगितली आहे आंबडवे येथील सुदामबाबा सकपाळ यांनी.

दीन, दुबळ्या, शोषित पीडितांसाठी उभे आयुष्य बाबासाहेबांनी वेचले. त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशातून स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय या चतुःसूत्रीवर आधारित आदर्श राज्यघटना त्यांनी देशाला दिली. महामानवाचे मूळ गाव आंबडवे. त्या वेळेच्या दापोली तालुक्‍यापासून ६१ किलोमीटर अंतरावर दूर. बाबासाहेबांचे भाऊ आनंद यांच्या लग्नासाठी विद्यार्थिदशेतील बाबासाहेब आंबडवेकडे आले. त्यावेळी ते नववीत शिकत होते. आनंद यांचा विवाह महाड तालुक्‍यातील गोमेंडी गावातील लक्ष्मी साळवे यांच्याबरोबर ठरला होता. बोटीने मुंबई-दाभोळ-दापोली कॅम्प मार्गे ते गावी आले. 

सर्व मंडळी लग्नाच्या धामधुमीत गुंतली होती; मात्र विद्यार्थिदशेतील भिवा या गर्दीत कोठेही दिसत नव्हता. त्यामुळे त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. सर्वांच्या तोंडी एकच प्रश्‍न, भिवा कुठे गेला..भिवा कुठे गेला? त्याचवेळी गावातील एक महिला पार्वती कासरूंग ही जंगलातून सुकी लाकडे घेऊन येत होती. गावानजीकच्या देवळात एक बालक काहीतरी वाचत बसल्याची माहिती तिने भिवाला शोधणाऱ्या लोकांना दिली. त्यानंतर सुभेदार सकपाळ आपल्या नातलगांसह देवळात गेले. तेव्हा भिवा तेथे वाचनात गर्क होता. त्यावेळी गाइड म्हणून असणारे तर्खडकर पुस्तकाचे ते वाचन करीत होते. 

गावचा आनंद
आंबडवे येथून आसवले, पंदेरी, म्हाप्रळ, चिंभावे, वराठी मार्गे गोमेंडी असा त्यांनी साडेतीन ते चार तासांचा पायी प्रवास केला. लग्न लागल्यानंतर पुन्हा त्याच पाऊल वाटेने त्यांनी आंबडवेकडे प्रयाण केले. या गावांना बाबासाहेबांचे पाय लागले हा त्या गावांसाठी परमोच्च क्षण आहे, असे आज येथील लोक सांगतात.