बॅक वॉटर देईल कोकणातील तरुणांना रोजगार ; मार्केटिंगमुळे मिळेल पर्यटनाला चालना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

तरुणांना हाउस बोटकरिता अर्थसाहाय्य, छोट्या जेटी आणि प्रभावी मार्केटिंग केले तर तरुणांना रोजगार आणि अर्थव्यवस्थेत भक्कम आधार मिळेल

रत्नागिरी : ‘गॉडस्‌ ऑन कन्ट्री’ तसेच पूर्वेकडील ‘व्हेनिस’ अशी बिरुदावली मिरवित जगाच्या पर्यटन नकाशावर आपले स्थान केरळने निश्‍चित केले. अलेप्पी-कोट्टायम या पट्ट्यात ‘बॅक वॉटर’ व्यवसायात २३०० हाउस बोटींमार्फत पाच हजार तरुणांना रोजगार मिळाला. हीच संकल्पना कोकणात राबवल्यास मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार मिळेल. तरुणांना हाउस बोटकरिता अर्थसाहाय्य, छोट्या जेटी आणि प्रभावी मार्केटिंग केले तर तरुणांना रोजगार आणि अर्थव्यवस्थेत भक्कम आधार मिळेल, असे प्रतिपादन ॲड. विलास पाटणे यांनी केले.

हेही वाचा -  रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय दांडेआडोम, कापडगावला : उदय सामंत -

ते म्हणाले, भारतात ताजमहाल आणि म्हैसूर पॅलेसच्या पलीकडे भारतात बघण्यासारखे खूप काही आहे, अशा मार्केटिंग ब्रॅंड ‘बॅक वॉटर’ संकल्पनेने केरळने नाव कमावले. कोकणातील खाड्यांमध्येही असे पर्यटन व्हायला हवे. यातून कोकणी तरुण आत्मनिर्भर होऊ शकतो. कोरोना लॉकडाउनमुळे अनेक मुंबईकरही गावी राहू लागले आहेत. खाड्या, नद्यांच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या या तरुणांनी बॅकवॉटर पर्यटनासाठी सज्ज व्हायला हवे तसेच चांगले मार्केटिंग केल्यास पर्यटक नक्कीच कोकणाकडे आकर्षित होतील व येथे राहतील.

रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये, जयगड, सावित्री, वशिष्ठी, जैतापूर पडेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निलारी, देवबाग, तारकर्ली, तेरेखोल, देवबाग तारकर्ली आदी नद्या-खाड्यांमधील भुरळ घालणारे सौंदर्य, हिरवागार निसर्ग, रुचकर मासे दिमतीला आहेत. तरीही कोकणात ‘बॅक वॉटर’ संकल्पना कोणत्याही सत्ताधाऱ्यांना राबवता आली नाही. 

केरळचे रोल मॉडेल

३८ नद्या, ५ मोठे तलाव यातील १५०० कि. मी. च्या जलप्रवाहात केरळने आपल्या पर्यटन विकासाची बिजे शोधली. विश्वासार्ह सुरक्षितता आणि प्रभावी संपर्क व्यवस्था निर्माण केली. निसर्गापासून २०० कि.मी. आत पर्यटकांचे आकर्षण ठरेल, असे ‘डेस्टिनेशन’ तयार केले. यातून केरळच्या जीडीपीचा १० टक्के वाटा, २३.५ टक्के रोजगार ८७६४ कोटींचे परकीय चलन आणि किमान तीस हजार तरुणांना रोजगार, प्रभावी मार्केटिंगने केरळच्या ‘बॅक वॉटर’ ने मिळवून दिला.

हेही वाचा - मिऱ्या बंधरावर लवकरच होणार आता समुद्राखालील जग पाहण्याचे स्वप्न पुर्ण -

पाटणेंची अपेक्षा

- कोकणाने राजकारणाबाहेर पडावे
- पर्यटनाच्या नकाशावर आपले नाव अधोरेखित करावे
- पर्यटक नैसर्गिक सौंदर्याच्या असतो शोधात
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: back water provide employment opportunities to t]youth in konkan with the help of kerala pattern in ratnagiri