श्रींच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न 

भूषण आरोसकर
Monday, 20 July 2020

ज्या गावांमध्ये बससेवा नाही किंवा जो गाव मुख्य रस्त्यापासून बराच अंतर दूर आहे, अशा गावातील रस्त्यांची दुर्दशा आजही पाहावयास मिळते.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये असलेले मूर्तिकार कित्येक वर्षे आपली मूर्ती कला जोपासत आहेत; मात्र या मूर्तिशाळांकडे ये-जा करणाऱ्यांना रस्त्यांची पूर्णतः दुर्दशा झाल्याने गणेशचतुर्थीच्या सणात मूर्तींची वाहतूक करताना अशा खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो आहे. उदासीन शासनाकडून वाडी-वस्तीवरील अनेक रस्त्यांची डागडुजी करणे व नूतनीकरण गरजेचे आहे. 

अनेक गावांमध्ये आजही मूर्तिशाळा मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्यात एकाच गावात आठ ते दहा मूर्तिशाळा असणारीही गावे आहेत. जिल्ह्यात अनेक गावांतील रस्ते हे खासगी रस्ते तसेच पायवाट प्रकारात मोडतात. रस्त्यांचा विकास हवा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या नावावर रस्ता असणेही तेवढेच गरजेचे आहे. ज्या गावांमध्ये बससेवा नाही किंवा जो गाव मुख्य रस्त्यापासून बराच अंतर दूर आहे, अशा गावातील रस्त्यांची दुर्दशा आजही पाहावयास मिळते.

जिल्ह्यामध्ये काही मोठी महसुली गावे असतात. अशा गावांत असलेल्या मोठ्या वाड्या-वस्त्यांवर पायवाट किंवा खासगी वाटा वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचलेल्याच नसतात. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांतील असलेले रस्ते अद्यापही खड्डेमय स्थितीत कायम आहेत. ग्रामपंचायतीच्या नावावर रस्ते नसल्याने हे रस्ते विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. चतुर्थीचा सण आल्यानंतर गावागावांत असलेल्या मूर्तिशाळापर्यंत ये-जा करण्यात काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात. खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो. काही मूर्तिशाळांपर्यंत वाहने पोहचू शकत नसल्याने मूर्तिकारांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे ग्राहक सुरक्षित रस्ते असलेल्या मूर्तिशाळांमध्ये मूर्ती बनवण्यासाठी पसंती देतो. कोकणची मूर्तिकला गेली कित्येक वर्षे आपल्या कलेचा वसा तसेच परंपरा टिकवून आहे. अशा मूर्तिकारांना सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीत अथवा व्याज दरात सवलत मिळत नाही. 

डागडुजी तरी करा! 
निदान मूर्तिशाळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची तरी डागडुजी करावी, अशी मागणी मूर्तिकार करत आहेत. गोवा भागातील अनेक नागरिक अद्यापही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मूर्ती बनवण्यासाठी पाट देतात. गोवा सीमेवरील गावांमध्ये अनेक मूर्तिशाळा आहेत. तालुक्‍यातील निगुडेसारख्या गावामध्ये सुमारे आठ ते नऊ मूर्तिशाळा कार्यरत आहेत. गोवा तसेच सिंधुदुर्गातील अनेक ग्राहकांवर या मूर्तिशाळांचा रोजगार चालतो. त्यामुळे या दृष्टीने शासनाकडून विचार होणे गरजेचे आहे. 

साधन सुविधा हव्यात 
मूर्तिकारांना व्यवसायासाठी सहाय्यभूत म्हणून साधन सुविधा व साहित्य शासनाकडून उपलब्ध झाल्यास त्याचा बराच फायदा मूर्तिकारांना होऊ शकतो. रंगकाम किंवा मूर्तीसाठी वापरण्यात येणारे साचे यासाठी मातीची उपलब्धता आदी गोष्टी शासनामार्फत प्राप्त झाल्यास मूर्तिकारांना व्यवसायात फायदा होईल. गणेश चतुर्थीच्या सणामध्ये मूर्तिकारांचा व्यवसाय हंगामी स्वरूपात चालत असतो. 

कर्जाचा बोजा तरीही... 
मूर्तिकारांना जिल्हा बॅंकेकडून साडेदहा टक्के व्याज दराच्या स्वरूपात कर्ज देण्यात येते. एवढ्या मोठ्या व्याज दराने कर्ज घेतले असतानाही मूर्तिकारांना त्याचा फार मोठा फायदा होत नाही. कर्जाऊ रक्कम अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मूर्तीघरांसाठी देण्यात येते. मूर्ती व्यवसाय हंगामी स्वरूपात असला तरी त्यानंतर काही महिने मूर्तिकारांना ते कर्ज फेडावे लागते. त्यामुळे व्याज दरात तसेच व्याज दराच्या कालावधीत शासनाने काहीतरी सवलत द्यावी, अशी मागणी मूर्तिकार करत आहेत. 

मूर्तिशाळेकडे जाणारे रस्ते हे बऱ्याच ठिकाणी खराब झाले आहेत. प्रत्येक गावाचा विकास केल्यास गावातील रस्ते वाहतूकही योग्य होईल. खड्डेमय रस्त्यांची पावसाळ्यात आणखीनच दुर्दशा होते. चाकरमानी, नागरिकांना याचा फटका बसतो. मूर्तीची ने-आण करताना त्रास होतो. 
- गुरुदास गवंडे, निगुडे उपसरपंच तथा मूर्तिकार. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad condition of roads in Sindhudurg district