रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता? ग्रामस्थांचा प्रश्न

दीपेश परब
Tuesday, 4 August 2020

वेंगुर्लेवरून शिरोडाला जाणाऱ्या मुख्य मार्गावर हे देवस्थान असून याठिकाणी असलेल्या वळणावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गाड्यांचे टायर खड्यात जाऊन नुकसानही होत आहे.

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - आरवली येथील दारुष्टा देवस्थाननजीक वेंगुर्ले-शिरोडा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून तत्काळ या रस्त्याची डागडुजी करावी, अन्यथा 15 ऑगस्टला राष्ट्रीय कॉंग्रेसचे रेडी विभागीय अध्यक्ष मयूर आरोलकर यांच्यासह येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

वेंगुर्लेवरून शिरोडाला जाणाऱ्या मुख्य मार्गावर हे देवस्थान असून याठिकाणी असलेल्या वळणावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गाड्यांचे टायर खड्यात जाऊन नुकसानही होत आहे. काही दिवसांपूर्वी या खड्यामुळेच एक अपघात झाला होता; मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही; मात्र गाड्यांचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कॉंग्रेस पक्षाचे रेडी विभागीय अध्यक्ष मयूर आरोलकर यांनी दिली.

या रस्त्याची डागडुजी न केल्यास ग्रामस्थांना घेऊन 15 ऑगस्टला आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी सार्वजनिक बांधकामला दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबन बागकर, शेखर कुडव, राजू गोडकर, रविंद्र वराडकर, किरण तांडेल, पपू बागकर, उत्तम चव्हाण, विलास चिपकर आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad road vengurle taluka konkan sindhudurg