'शिवसेनेने भावनेच्या आहारी जाऊन रिफायनरी प्रकल्प रद्द केला'

मकरंद पटवर्धन
Tuesday, 17 November 2020

तीन लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प कोकणचे भविष्य उजळवून टाकणारा होता. मात्र दुर्दैवाने भावनेच्या आहारी जाऊन शिवसेनेने हा प्रकल्प रद्द केला.

रत्नागिरी : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आणि केंद्र सरकारने जिल्ह्यात नाणार रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. तीन लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प कोकणचे भविष्य उजळवून टाकणारा होता. मात्र दुर्दैवाने भावनेच्या आहारी जाऊन शिवसेनेने हा प्रकल्प रद्द केला. त्यामुळे या रिफायनरी प्रकल्पाचा ठाकरे सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी भाजप नेते, माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे.

बाळ माने म्हणाले, कोकणातील लाखो तरुणांच्या हातांना रोजगार देणारा हा मोठा प्रकल्प आहे. मात्र काही लोकांच्या विरोधाला पाठिंबा देत, त्यांच्या भावनेच्या आहारी जात शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध केला. शिवसेनेच्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडला. विरोधामुळे हा प्रकल्प होऊ शकलेला नाही. शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी या प्रकल्पाला विरोध केला. परंतु देश, राज्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा होता. नवीन रोजगार उपलब्ध होऊन कोकणचे भविष्य उजळवून टाकणारी मोठी गुंतवणूक येथे आली असती.

हेही वाचा - कोकणात स्थानिकांना आता रोजगार संधी ; जलाशयात नौकाविहारातून पर्यटन -

शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला. त्यामुळे जिल्ह्यासाठी असलेली एक मोठी संधी दूर गेली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. हा रिफायनरी प्रकल्प ठाकरे सरकारने नाणार येथे पुन्हा आणावा. नाहीतर येथील तरुण पिढी ठाकरे सरकारला माफ करणार नाही. म्हणून मला आजही वाटते की नाणार रिफायनरी व्हायला हवी. त्यातून कोकणचा विकास होणार आहे. 

रत्नागिरीचे दरडोई उत्पन्न वाढून प्रचंड विकास होईल. राज्याच्या महसुलात वाढ होणार आहे. या सर्व भूमिका विचारात घ्यायला हव्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा फेरविचार व्हावा, असेही माने म्हणाले.

प्रकल्पासाठी समर्थन आणि विरोधही !

राजापूर तालुक्यामध्ये नाणार आणि अन्य 16 गावांच्या हजारो एकर जमिनीवर रिफायनरी प्रकल्प सेना - भाजप युती सरकारच्या काळात मंजूर झाला होता. मात्र काहींचा विरोध तर काहींचे समर्थन या वादात हा प्रकल्प शिवसेनेने रद्द केला. त्यानंतरही कोकणातील लोकांना येथेच रोजगार मिळावा आणि कोकणच्या विकासाचा रथ पुढे हाकण्याची गरज अनेकांना वाटते आहे. रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी समर्थकांची फौज मैदानात उतरली आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bal mane said on konkan refinery project shiv sena again think in ratnagiri