बांबू शेतीतून पिकवले पडीक जमिनीवर सोने माजी सैनिक घाग यांचे परिश्रम

सौंदळमधील दहा एकरवर लागवड, सफरचंद, गुलाबी करवंदाचा प्रयोग
ratnagiri
ratnagirisakal

राजापूर : तालुक्यातील सौंदळ येथील माजी सैनिक वासुदेव घाग यांनी देशरक्षणातील योगदानानंतर शेतकरी म्हणून शेतीक्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा ध्यास घेतला. त्यांनी वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनीमध्ये व्यावसायिकदृष्ट्या विविध प्रकारच्या बांबूची लागवड केली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये सौंदळ येथे बांबू शेतीतून सोनं पिकलं आहे. सद्यःस्थितीमध्ये या लागवडीच्या माध्यमातून दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल पाहता सुरवातीला या लागवडीकडे विनोदाने पाहणाऱ्या लोकांच्या नजरा आता उत्सुकता आणि व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये काहीशा बदलल्या आहेत.

कोकणामध्ये शेताच्या बांधावर काही मोजक्या प्रमाणात बांबू लागवड झाल्याचे चित्र दिसत असताना माजी सैनिक घाग यांनी दिवसरात्र राबत स्वकष्टाने व्यावसायिक दृष्टिकोनातून फुलवलेली बांबूची शेती आणि अन्य शेतीतील केलेले प्रयोग कोकणातील शेतकऱ्यांसाठी शेतीच्या हमखास उत्पन्नाच्यादृष्टीने दिशादर्शक ठरत आहे. बांबूची कंदमुळे आणि रोपांचे साळींदरांसह रानटी डुक्करांकडून नासधूस केली जाते. या नासधुसीतून घाग यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला यापूर्वी सामोरे जावे लागले आहे

त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्च करून करंट लागणारे तारांचे कुंपण घातले आहे. त्यातून वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीला आळा बसला आहे. अशी केली बांबू लागवड बांबू लागवडीसाठी अडीच बाय दीड फूट उंचीचा खड्डा खोदण्यात आला. हे खड्डे खोदत असताना दोन रांगांमध्ये २० फूट अंतर राहील याकडे लक्ष देण्यात आले, तर एका रांगेतील दोन खड्ड्यांमध्ये दहा फुटांचे अंतर ठेवण्यात आले. बांबूच्या कंदमुळाची लागवड करताना त्यामध्ये गांडूळ खत टाकण्यात आले. रोपांच्या पोषक वाढीसाठी गांडूळ खत उपयुक्त ठरल्याचे घाग सांगतात.

याव्यतिरिक्त कंदाला चांगली मुळे (पालं) पकडणे अधिक सुलभ व्हावे, या दृष्टीने खताचाही वापर केला. सद्यःस्थितीमध्ये घाग यांच्या बागेमध्ये २२ हजार बांबू तोडीच्या प्रतीक्षेत आहेत. हिरवं सोनं पिकवण्यासाठी कुटुंबाची मदत शेतीचा ध्यास घेतलेले माजी सैनिक वासुदेव घाग यांनी बांबू लागवडीसह अन्य प्रकारची शेती करण्यासाठी दिवसरात्र शेतामध्ये स्वतः कष्ट उपसले आहेत. रोपांची लागवड करण्यासह मशागत करण्यासाठी ते शेतामध्ये स्वतः राबतात. त्यासाठी त्यांना पत्नी वैशाली, सैन्यदलामध्ये कार्यरत असलेला मुलगा विवेक, सून पूजा, मुलगी वेदश्री यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याचे ते सांगतात. असे आहे अर्थकारण लागवडीनंतर दोन वर्षे बांबूंच्या रोपांची चांगलीच वाढ झाली. त्यानंतर त्याची तोड केली.

त्यामध्ये आजपर्यंत सुमारे सहा हजार बांबूंची तोड करण्यात आल्याचे घाग सांगतात. बांबू तोड करण्यासह त्याची विक्री करण्यासाठी दलालांचा वा मध्यस्थांची मदत घेण्याऐवजी स्वतःच कामगार लावून तोड केल्याचे ते सांगतात. रोपांची विक्री स्थानिक खरेदीदारांना करण्याऐवजी बाजारपेठेचा शोध घेऊन थेट पैठण, औरंगाबाद येथे मोठ्या खरेदीदाराला स्वतः विक्री केल्याचेही ते सांगतात. तोडण्यात आलेल्या बांबूची प्रती बांबू ८० रुपयाने विक्री केली. त्यातून सुमारे चार लाख ८० हजार रुपयांची उलाढाल झाली. बांबूच्या कंदांसह रोपांच्या विक्रीतून सुमारे दोन लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे ते सांगतात.

सद्यःस्थितीमध्ये बागेमध्ये २२ हजार बांबूतोडीच्या प्रतीक्षेत असून, त्यातून आगामी काळामध्ये सुमारे १५ लाखांहून अधिक उत्पन्न मिळेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. पाण्यासाठी ठिबक सिंचनचा उपयोग लागवड केलेल्या बांबूच्या कंदांसह रोपांना आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बागेमध्ये ठिबक सिंचनची उभारणी केली आहे. पाणी उपलब्धततेसाठी बागेमध्ये विहीरही खोदण्यात आली आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून चार दिवसांनी रोपांना पाणी दिले जाते. त्यामध्ये सर्वसाधारणतः प्रत्येक रोपाला आठ लिटर पाणी दिले जात असल्याचे घाग सांगतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळेला रोपांना पाणी देण्याला प्राधान्य दिले जाते. जेणेकरून त्यामध्ये सुमारे ९० टक्के पाण्याची बचत होते. तुती लागवडीच्या माध्यमातून रेशीम शेतीचा अनोखा प्रयोग माजी सैनिक घाग यांनी या शेतामध्ये बांबू लागवडीसह तुती लागवडीच्या माध्यमातून रेशीम शेतीचा अनोखा प्रयोगही हाती घेतला आहे.

त्यामध्ये सुमारे दीड एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड केली असून, या ठिकाणी रेशीम उत्पादन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुती लागवडीसाठी लागणारी रोपे तयार करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये नर्सरी तयार केली असून, त्या नर्सरीमध्ये तयार करण्यात आलेली रोपे त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये लागवड करताना अन्य शेतकऱ्यांनाही लागवडीसाठी उपलब्ध करून देत अर्थार्जनाचा नवा स्त्रोत निर्माण केला आहे. पडीक जमीन आणली ओलिताखाली सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर घाग यांनी गेल्या कित्येक वर्षापासून वर्षानुवर्षे पडीक असलेली सुमारे दहा एकर जमीन लागवडीखाली आणण्याच्या उद्देशाने खरेदी केली. मुंबईतील घराची विक्री करून जमीन खरेदीसाठी त्यांनी निधीची उभारणी केली. खरेदी केलेली जागा वर्षानुवर्षे पडीक असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलवाढ झालेली होती. हे वाढलेले जंगल तोडून त्या ठिकाणी बांबू लागवड केली. लागवड केलेल्या जमिनीमध्ये गांडूळाचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे या जमिनीमध्ये अन्य परिसरातील जमिनीच्या तुलनेमध्ये अधिक सुपीकता आहे. त्याचा फायदा बांबूची चांगली वाढ होण्यासाठी झाला. बांबू लागवडीसाठी असा ठरला टर्निंग पॉईंट खरेदी केलेल्या जागेमध्ये काजू लागवड करण्याचा घाग यांचा उद्देश होता. त्या दृष्टीने त्यांनी खड्डे खोदून अन्य नियोजनही केले होते;

मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन नारकर यांची गवाणे (ता. लांजा) येथील बांबू लागवडीचे प्रशिक्षण घेण्याची केलेली सूचना आणि त्यानंतर झालेले प्रशिक्षण बांबू लागवडीसाठी टर्निंग पॉइंट ठरल्याचे घाग सांगतात. त्यानंतर ओरोस येथील संतोष खोत आणि डॉ. फंड यांची भेट घेतली. फंड यांनी बांबू लागवडीतील सकारात्मक अर्थकारण पटवून दिले. त्यातून, प्रेरणा घेत बांबू लागवडीचा निर्णय घेतल्याचे घाग सांगतात.

त्यानंतर, काजू लागवडीसाठी खोदलेले खड्डे बुजवून त्या ठिकाणी माना, सोनचिवा आदी बांबूच्या प्रजातीची कंदमुळे आणि रोपांची लागवड केल्याचे ते सांगतात. अशी उपलब्ध केली कंदमुळे बांबू लागवडीसाठी लागणारी कंदमुळे वा रोपे उपलब्ध करणे शक्य नव्हते. मात्र, सौंदळ परिसरासह आजिवली, झर्ये, रिंगणे, कोंडवशी, केळवली, ओझरतिवरे, भोम (ता. वैभववाडी) आदी परिसरातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून कंदमुळे आणि रोपांची उपलब्धी केली. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून कंदमुळे उपलब्ध करणे, खोदून कंदमुळे काढणे या कामी मुलगी वेदश्रीचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे घाग सांगतात. सुरवातीला २०१८ मध्ये तीनशेहून अधिक कंदमुळे अन् रोपांची लागवड केली. त्यानंतर, गतवर्षी सुमारे ८०० रोपांची लागवड केली. त्यामध्ये घाग यांनी स्वतः शेतामध्ये बांबूच्या निर्मिती केलेल्या रोपांचाही समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com